Satara: ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातानंतर ट्रकचालक झाला पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:39 IST2025-08-12T16:39:31+5:302025-08-12T16:39:49+5:30
हेल्मेट असते तर वाचला असता जीव

Satara: ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, अपघातानंतर ट्रकचालक झाला पसार
सातारा : येथील वाढे फाट्यावर ट्रकच्या चाकाखाली सापडून साताऱ्यातील एका १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी रात्री अकरा वाजता झाला. अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.
आकाश नंदकुमार गोळे (वय १८, रा. मंगळवार पेठ, सातारा), असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आकाश गोळे हा रविवारी दुपारी दुचाकीवरून त्याच्या मित्राला सोडायला लाेणंद येथे गेला होता. तेथून तो दुचाकीवरून परत साताऱ्याकडे येत होता. वाढे फाटा पुलापासून पुढे आल्यानंतर ओंकार हाॅटेलसमोर पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा त्याला धक्का लागला. त्यामुळे त्याचा तोल गेल्याने तो रस्त्यावर पडला. यातच ट्रकचे मागचे चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केले.
अपघाताची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्यातील हवालदार जयवंत कारळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मृत तरुणाचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम पोलिसांनी तातडीने हाती घेतले. एका सीसीटीव्हीमध्ये ट्रक दिसत आहे. परंतु ट्रकचा नंबर स्पष्टपणे दिसत नाही. वाढे गावातील सीसीटीव्ही फुटेज आता तपासले जाणार आहेत. या अपघाताची सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
हेल्मेट असते तर जीव वाचला असता
आकाश गोळे हा एका गॅरेजमध्ये काम करत होता. अपघातावेळी त्याने जर हेल्मेट घातले असते तर त्याचा जीव नक्कीच वाचला असता. डोक्यावरून जरी चाक गेले असते तरी हेल्मेटमुळे चाक निसटले असते. दर्जेदार हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचला असता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.