नाही तर तुला राहणे मुश्कील करीन, धमकी देत साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १५ लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 13:19 IST2026-01-15T13:19:04+5:302026-01-15T13:19:39+5:30
चाैघांवर गुन्हा दाखल

नाही तर तुला राहणे मुश्कील करीन, धमकी देत साताऱ्यातील बांधकाम व्यावसायिकाकडे मागितली १५ लाखांची खंडणी
सातारा : ‘तुला साताऱ्यात बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला प्रत्येकी १५ लाखांची खंडणी द्यावी लागेल,’ अशी मागणी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चाैघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखिल प्रभाळे, रणजित कांबळे, हणमंत पवाडे यांच्यासह अन्य एका अनोळखी व्यक्तीचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
बांधकाम व्यावसायिक समर्थ अनिल लेंभे (वय ३०, रा. सिव्हिल काॅलनी, संभाजीनगर, सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘तुला साताऱ्यात बांधकाम व्यवसाय करायचा असेल तर आम्हाला दर महिन्याला १ लाख रुपये, तसेच लगेच ५ लाख रुपये मागणी करून न दिल्याने संशयितांनी मारहाण केली, तसेच ॲट्राॅसिटीच्या गुन्ह्यात अडकवितो, अशी धमकी देऊन चारचाकी गाडी घेऊन निघून गेले, तसेच २२ सप्टेेंबर २०२५ रोजी मी पारंगे चाैक येथे असताना संशयितांपैकी १ ते ३ यांनी गाडीसह शिवराज पेट्रोलपंपाच्या बाजूच्या बाजार समितीच्या रस्त्यावर नेऊन त्यांनी आम्हाला तिघांना प्रत्येकी १५ लाख रुपये द्यावे लागतील.
त्यानंतर हाताने मारहाण करून ‘तुझी गाडीपण देणार नाही आणि प्रत्येकी १५ लाख रुपये आम्हाला २५ डिसेंबरपर्यंत द्यायचे. नाही तर तुला साताऱ्यात राहणे मुश्कील करीन, नाही तर तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास हवालदार गुरव करीत आहेत.