बनावट धनादेशाने ४३ लाखांचा गंडा

By Admin | Updated: July 27, 2014 00:20 IST2014-07-27T00:11:18+5:302014-07-27T00:20:36+5:30

दोघांवर गुन्हा : ‘बँक आॅफ बडोदा’कडून फिर्याद दाखल

43 lakh for fake checks | बनावट धनादेशाने ४३ लाखांचा गंडा

बनावट धनादेशाने ४३ लाखांचा गंडा

कऱ्हाड : खोट्या धनादेशाद्वारे ‘बँक आॅफ बडोदा’ या बँकेला दोघांनी ४३ लाख ८२ हजार ६०० रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी बँकेच्या कऱ्हाड शाखेचे व्यवस्थापक शंकर महादू ठोंगिरे यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
देवशरण जैस्वाल (रा. बैगणवाडी, गोवंडी-मुंबई), पराग जयसुखलाल राठोड (रा. वापी-गुजरात) यांच्यावर याप्रकरणी कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक आॅफ बडोदाच्या मुंबईतील खांड बाजार शाखेत रविलाल विशानजी मारू यांचे बचत खाते आहे. रविलाल मारू यांच्या नावे बँकेने त्यांना चेकबुक अदा केले आहे. दरम्यान, २५ जून रोजी रविलाल मारू यांच्या खात्यावरील ९ लाख ३० हजारांचा देवशरण जैस्वाल या व्यक्तीच्या नावे असलेला धनादेश ‘एचडीएफसी’ बँकेतून क्लिअरिंगद्वारे पेमेंटसाठी बँक आॅफ बडोदाच्या कऱ्हाड शाखेत आला. तसेच संबंधित खात्यावरील १८ लाख ९१ हजार ९०० रुपयांचा देवशरण जैस्वाल याच व्यक्तीच्या नावे दुसरा धनादेश २८ जून रोजी ‘एचडीएफसी’ बँकेकडून क्लिअरिंगद्वारे पेमेंटसाठी बँक आॅफ बडोदाच्या कऱ्हाड शाखेकडे आला. त्यानंतर ३ जुलै रोजी रविलाल मारू यांच्याच खात्यावरील १५ लाख ६० हजार ७०० रुपयांचा पराग जयसुखलाल राठोड या व्यक्तीच्या नावे तिसरा धनादेश ‘एचडीएफसी’ बँकेकडून क्लिअरिंगद्वारे पेमेंटसाठी बँक आॅफ बडोदाच्या कऱ्हाड शाखेत आला. संबंधित तिन्ही धनादेशांची रक्कम बँक आॅफ बडोदाने अदा केली.
दरम्यान, रविलाल मारू यांनी बँक आॅफ बडोदाच्या बडोदा येथील मुख्य कार्यालयात जाऊन त्यांच्या खात्यावर वठविण्यात आलेले तिन्ही धनादेश खोटे असल्याचे सांगत त्यांच्याकडील मूळ धनादेश बँकेला सादर केले. याबाबतची माहिती बडोदा येथील मुख्य कार्यालयातून कऱ्हाड शाखेला देण्यात आली.
धनादेश खोटे
कऱ्हाड शाखेने संबंधित मूळ धनादेश मागवून घेऊन क्लिअरिंगद्वारे रक्कम अदा केलेले धनादेश तपासले असता संबंधित धनादेश खोटे असल्याचे निष्पन्न झाले. बँकेची फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर शाखा व्यवस्थापक शंकर ठोंगिरे यांनी याबाबतची फिर्याद कऱ्हाड शहर पोलिसांत दिली आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: 43 lakh for fake checks