Sangli Accident: कारची दुभाजकाला धडक, मुलाच्या फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी जाताना आईचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:10 IST2026-01-03T16:09:58+5:302026-01-03T16:10:14+5:30
आष्टा-सांगली रस्त्यावरील घटना

Sangli Accident: कारची दुभाजकाला धडक, मुलाच्या फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी जाताना आईचा मृत्यू
आष्टा : आष्टा सांगली रस्त्यावर डांगे कॉलेज बस स्टॉपनजीक चारचाकीने दुभाजकाला दिलेल्या धडकेत एक जण ठार, तर तिघे जण गंभीर जखमी झाले. मुलाच्या फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी जाताना आशा पंडितराव देशमुख (वय ६५, रा. विजयनगर, सांगली, मूळगाव मर्दवाडी) यांचा अपघातातमृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली.
आष्टा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मर्दवाडीचे उपसरपंच भारत पंडितराव देशमुख यांनी आष्टा येथे फिटनेस क्लब सुरू केला आहे, त्याचे गुरुवारी उद्घाटन होते, या कार्यक्रमासाठी वडील पंडितराव भाऊसाहेब देशमुख (वय ७०), आई आशा पंडितराव देशमुख (वय ६५), बहीण पूनम विकास पाटील व सुमित्रा अनिल लवटे (वय ४५, चौघे रा. विजयनगर, सांगली) हे चारचाकी क्रमांक एमएच १० डीक्यू ९४९७ मधून सांगली ते आष्टा रस्त्याने येत होते.
यावेळी डांगे कॉलेज बस स्टॉप सर्वोदय कारखाना रस्त्यानजीक सर्वोदय कारखाना रस्त्याने ट्रक आडवा आल्याने अपघात होईल म्हणून पंडितराव देशमुख यांनी त्यांची चारचाकी रस्त्याच्या उजव्या बाजूला घेतली. यावेळी ती गाडी दुभाजकाला धडकली. या धडकेत पंडितराव देशमुख यांच्या डोक्याला दोन्ही पायांना, डोक्याला, आशा देशमुख यांच्या डोक्याला, पूनम विकास पाटील यांच्या डोक्याला व सुमित्रा अनिल लवटे यांना किरकोळ दुखापत झाली.
जखमींना तातडीने मिरज येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशा देशमुख यांच्यावर मिरज येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी निधन झाले. या अपघातात चारचाकीचे नुकसान झाले. ट्रक चालक अपघातानंतर न थांबता निघून गेला. अपघाताबाबत सुजीत देशमुख यांनी आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सत्यजीत आवटे करीत आहेत.
मर्दवाडी गावावर शोककळा
मर्दवाडी (ता. वाळवा) येथील उपसरपंच भारत देशमुख यांच्या आई आशा देशमुख यांचे अपघाती निधन झाल्याची बातमी समजताच मर्दवाडी गावावर शोककळा पसरली. गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे, असा परिवार आहे.