मिरज येथे काँग्रेसच्या दोन नेत्यांत धक्काबुक्की

By Admin | Updated: March 12, 2015 23:50 IST2015-03-12T23:10:28+5:302015-03-12T23:50:17+5:30

महापालिका निवडणुकीच्या वादातून घडला प्रकार!

Two Congress leaders shout at Miraj | मिरज येथे काँग्रेसच्या दोन नेत्यांत धक्काबुक्की

मिरज येथे काँग्रेसच्या दोन नेत्यांत धक्काबुक्की

मिरज : महापालिका निवडणुकीच्या खटल्याच्या सुनावणीस न्यायालयात उपस्थित असलेल्या काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अय्याज नायकवडी व काँग्रेस नगरसेविका बेबीताई मालगावे यांचे पुत्र समीर मालगावे यांच्यात सांगली न्यायालयाच्या आवारात धक्काबुक्कीचा प्रकार घडला. उपस्थितांनी मध्यस्थी करून दोघांना रोखले. महापालिका निवडणूक वादातून घडलेल्या या प्रकाराची चर्चा सुरू होती. मिरजेतील प्रभाग आठमध्ये बेबीताई मालगावे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याने वहिदा नायकवडी यांनी बंडखोरी केली होती. मात्र, बेबीताई मालगावे या निवडून आल्या. निवडणूक निकालानंतर वहिदा नायकवडी यांनी बेबीताई मालगावे यांनी अवैध बांधकाम केल्याच्या मुद्द्यावरून त्यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान दिले आहे. सांगली न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. गुरुवारी न्यायालयात सुनावणीसाठी नायकवडी व मालगावे दोघे उपस्थित असताना पुढील तारीख मिळाल्यानंतर समीर मालगावे हसल्याने अय्याज नायकवडी आक्रमक झाले. दोघांत बाचाबाची होऊन परस्परांच्या अंगावर धावून गेल्यानंतर काहीजणांनी मध्यस्थी करून दोघांना रोखले. यापूर्वी वहिदा नायकवडी यांनी महापालिका निवडणुकीत पराभवानंतर प्रतिस्पर्धी आरिफ चौधरी यांच्याशी झालेली न्यायालयीन लढाई जिंकली होती. निवडणुकीतील वैमनस्यातून न्यायालयाच्या आवारात झालेल्या या संघर्षाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. या घटनेबाबत पोलिसांत तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Two Congress leaders shout at Miraj