सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ४० लाखांचा ऐवज लुटला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 15:27 IST2025-10-08T15:25:44+5:302025-10-08T15:27:30+5:30
रेठरेधरणला माजी सैनिकाचे घर फोडले : शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यात घरफोड्या

सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; ४० लाखांचा ऐवज लुटला, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
सांगली/शिराळा/रेठरे धरण/कडेगाव : जिल्ह्यात शिराळा, वाळवा, मिरज तालुक्यातील काही गावांमध्ये चोरट्यांनी मंगळवारी धुमाकूळ घालत भरदिवसा घरफोड्यांमधून ४० लाखाहून अधिक ऐवज लंपास केला. या घटनेनंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांसह, प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. नागरिकांमध्ये या घटनांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रेठरेधरण (ता. वाळवा) येथील बच्चाकानगर परिसरात माजी सैनिक विष्णू जाधव यांच्या घरात मंगळवारी दुपारी दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे २६ तोळे दागिने आणि ९२ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली.
रेठरेधरण ते वाघवाडी रस्त्यावरील बच्चाकानगर वसाहतीत विष्णू जाधव हे पत्नी, मुलगा व सून यांच्यासह राहत होते. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता विष्णू जाधव, त्यांची पत्नी सिंधू व सून कोमल जाधव हे सर्वजण घराला कुलूप लावून धुमाळवाडी येथील शेतात गेले. मुलगा विजय जाधवही कामावर गेला होता. दुपारी सुमारे एक वाजता भिंतीवरून उडी मारून चोरट्यांनी घराच्या बाहेरील दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील दोन्ही कपाटातील दागिने लंपास केली.
विष्णू जाधव व कोमल जाधव दुपारी दोन वाजता घरी आले. तेव्हा दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी इस्लामपूर पोलिसांना कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरु केली. रेठरे धरण येथे चोरी करण्यापूर्वी, पेठ ते सुरूल रस्त्यावरील नायकलवाडी येथील प्रशांत नायकल यांच्या बंद घरातील दागिन्यांची चोरीही चोरट्यांनी केली आहे.
प्रशांत नायकल यांच्या घराजवळ राहणाऱ्या भावजय रोहिणी राहुल नायकल यांनी चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, चोरट्यांनी त्यांच्यावर दगड मारून त्यांना जखमी करीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. जखमी रोहिणी नायकल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चोरटे म्हणाले, ‘फिर आयेंगे’
जखमी रोहिणी यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ही तीन चोरटे काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आले होते. त्यांनी तोंडाला मास्क लावले होते, केस वाढविलेले होते. त्यांनी जवळ धारधार हत्यारे बाळगले होते. चोरट्यांनी जाताना ‘फिर आयेंगे’, असे म्हटल्याचेही रोहिणी यांनी सांगितले.
रेठरेधरणमध्ये २६.७५ तोळे सोन्याचे दागिने लंपास
लक्ष्मीहार : २ तोळे
गंठण : ६.५ तोळे
बांगड्या : ४ तोळे
राणीहार : ३.५ तोळे
नेकलेस : ३.५ तोळे
चेन : ४ तोळे
अंगठ्या : ३.२५ तोळे
रोकड : ९२०००
वाजेगावात ७८ हजारांचा ऐवज लंपास
वाजेगाव (ता. कडेगाव)येथे अज्ञात चोरट्यांनी एका वृद्ध महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत तब्बल ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. फिर्यादी सुमन बाबूराव माने (वय ७८ वर्षे ) यांनी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. १६ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे पदक, १२ हजार रुपयांची कर्णफुले, १६ हजार रुपयांचे सोन्याची कर्णफुले, १६ हजार रुपयांचे कर्णवेल आणि १८ हजार रोख असा ऐवज लंपास झाला. ७८ हजार किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेलार तपास करीत आहेत.