सांगली: विट्यात तलवारीचा धाक दाखवून जबरी चोरी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 13:02 IST2022-08-25T12:42:10+5:302022-08-25T13:02:59+5:30
पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सांगली: विट्यात तलवारीचा धाक दाखवून जबरी चोरी, दीड लाखाचा मुद्देमाल लंपास
दिलीप मोहिते
विटा : घराचे कुलुप तोडून आत प्रवेश करीत तलवारी व चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी रोख रक्कमेसह सुमारे १ लाख ४५ हजार ७५० रूपयांचा ऐवज लंपास केला. विटा येथील साळशिंगे रोडवर आज, गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
विटा येथील धान्य व्यापारी रामचंद्र प्रकाश गिड्डे (वय-३०) हे कुटुंबियासह राहतात. आज, गुरूवारी पहाटेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी हातात तलवार, चाकू व कटावणी घेऊन घरात प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी गिड्डे, त्यांची पत्नी व मुलगी यांना तलवार व चाकूचा धाक दाखवत रोख रक्कमेसह दागिने असा सुमारे १ लाख ४५ हजार ७५० रूपये किंमतीचा ऐवज लंपास केला.
या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक पद्मा कदम, पोलीस निरीक्षक संतोष डोके, उपनिरीक्षक पांडूरंग कण्हेरे यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अधिक तपास करीत आहेत.