Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; वांगीत जमीन अधिग्रहण अधिसूचनेची केली होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:21 IST2026-05-12T16:20:37+5:302026-05-12T16:21:47+5:30

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी घेण्याचा डाव हाणून पाडू

The farmers of Wangi in Sangli staged a holi against the Shaktipeeth highway against the land acquisition notification | Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; वांगीत जमीन अधिग्रहण अधिसूचनेची केली होळी

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक; वांगीत जमीन अधिग्रहण अधिसूचनेची केली होळी

वांगी : शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली सुपीक जमिनी हिरावून घेण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात वांगी (ता. कडेगाव) येथे शेतकऱ्यांचा संताप अक्षरशः रस्त्यावर उतरला. शक्तिपीठ महामार्गाविरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली बाधित शेतकरी, ग्रामस्थ आणि विविध संघटनांनी एकत्र येत जमीन अधिग्रहण अधिसूचनेची होळी करून सरकारविरोधात तीव्र रोष व्यक्त केला.

आमच्या हक्काच्या जमिनीवर बुलडोझर चालवू देणार नाही. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी घेण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. येरळा नदीकाठावरील अत्यंत सुपीक जमीन, ऊस, भाजीपाला आणि विविध नगदी पिकांसाठी ओळखला जाणारा पट्टा या महामार्गात जाणार असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.

सरकारने नुकतीच जमीन अधिग्रहण अधिसूचना जारी करताच संतापाचा जणू स्फोट झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश मोहिते, सोनहिरा कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी, माजी उपसरपंच बाबासो सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, राहुल साळुंखे, संतोष मोकळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष मोहन मोहिते, रत्नराज जाधव, नंदकुमार सूर्यवंशी, संदीप जगदाळे, संजय सूर्यवंशी, दिलीपराव मोहिते, गोपीनाथ चव्हाण यांच्या शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक इंचही जमीन सरकारला दिली जाणार नाही

वांगी येथे एकत्र जमलेल्या शेतकऱ्यांनी अधिसूचनेच्या प्रतीची होळी करून निषेध नोंदवला. शक्तिपीठ महामार्गासाठी एक इंचही जमीन सरकारला दिली जाणार नाही, असा ठाम निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिला.

बोरगावमध्ये कडकडीत बंद

पलूस : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात संतप्त झालेल्या बाधित शेतकरी व नागरिकांनी सोमवारी बोरगाव (ता. वाळवा) येथे संपूर्ण गाव बंदची हाक देत सरकारच्या धोरणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. शेतकरी, व्यापारी, नागरिक आणि युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गावातील सर्व व्यवहार पूर्णतः बंद ठेवले. गावभर निषेधाच्या घोषणा देत सरकारविरोधात तीव्र आंदोलन यावेळी छेडण्यात आले.

बोरगाव हे वाळवे तालुक्यातील शक्तिपीठात बाधित होणारे पहिले गाव तसेच सधन व शेतीप्रधान गाव म्हणून याची ओळख आहे. या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे सुपीक व पिकाऊ शेती उद्ध्वस्त होऊन अनेक शेतकऱ्यांची घरे, व्यवसाय आणि उपजीविका धोक्यात येणार असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. “विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या आयुष्यावर बुलडोझर चालविण्याचा हा प्रकार आहे,” अशा संतप्त प्रतिक्रिया सरपंच जितेंद्र पाटील यांनी व्यक्त करत याचा निषेध केला.

गावात मोठा पोलिस बंदोबस्त

दरम्यान, बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिवसभर गावात तणावपूर्ण शांतता होती. आंदोलनकर्त्यांनी सरकारने तातडीने हा प्रकल्प रद्द करावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Web Title : शक्तिपीठ राजमार्ग के खिलाफ किसान आक्रामक, वांगी में भूमि अधिग्रहण सूचना जलाई।

Web Summary : वांगी में शक्तिपीठ राजमार्ग के लिए भूमि अधिग्रहण के खिलाफ किसानों ने विरोध प्रदर्शन किया और अधिसूचना जला दी। उन्होंने अपनी उपजाऊ भूमि की रक्षा करने और निर्णय वापस न लेने पर तीव्र आंदोलन की चेतावनी दी।

Web Title : Farmers protest Shaktipeeth Highway, burn land acquisition notification in Wangi.

Web Summary : Farmers in Wangi protested against land acquisition for the Shaktipeeth Highway, burning the notification. They vowed to protect their fertile land and warned of intensified agitations if the decision wasn't reversed.