तासगाव पाणी योजना अपूर्णच!

By Admin | Updated: November 28, 2014 23:47 IST2014-11-28T22:46:13+5:302014-11-28T23:47:31+5:30

टप्पा क्र. ३ : २१ कोटींची योजना; नागरिकांत अस्वस्थता

Tasgaon water scheme is incomplete! | तासगाव पाणी योजना अपूर्णच!

तासगाव पाणी योजना अपूर्णच!

तासगाव : तासगाव शहराच्या विस्तारित भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी पाणी पुरवठा टप्पा क्र. ३ च्या योजनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. योजनेचे काम सुरू असले, तरी प्रत्यक्षात पाणी वितरण अद्याप सुरू झालेले नाही. जलशुध्दीकरण केंद्राला विजेचे कनेक्शन जोडावे लागणार आहे. हा तिसरा टप्पा कधी पूर्ण होणार, असा सवाल होत आहे.
तासगावच्या उपनगरांना, वस्ती भागासाठी या विस्तारित पाणीपुरवठा टप्पा क्र. ३ ची योजना करण्यात आली. मात्र प्रारंभापासून काही ना काही अडचणी येत गेल्याने ती रेंगाळली. योजना नगरपरिषदेची असली तरी, प्रत्यक्षात सर्व तांत्रिक बाबी व काम पूर्ण करून देण्याची जबाबदारीच जीवन प्राधिकरणची आहे.
२१ कोटीची ही पाणी योजना मंजूर करण्यात आली. वस्तुत: २०११ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना आता २०१४ संपत आले तरी योजनेचे थोडेसेही काम सुरू झालेले नाही. आ. आर. आर. पाटील यांनी निवडणुकीनंतर या योजनेबाबत अधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत जोरदार खडाखडी झाली होती. योजनेचे काम त्यातील पहिला भाग १५ दिवसांत सुरू झाला (दि. ३० पर्यंत) नाही, तर जीवन प्राधिकरणच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला होता.
यानंतर रेंगाळलेल्या कामाने थोडा का होईना पण वेग घेतला. योजनेतील पुणदी रस्ता परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे जीवन प्राधिकरणचे उपअभियंता ए. डी. चौगुले यांनी सांगितले. सध्या पाणीपुरवठ्याची चाचणी घेण्यात आली असल्याचे ते म्हणाले. पुणदी रस्ता विभागात यापूर्वी लाईन टाकण्यात आली आहे. एकूणच रेंगाळलेल्या या योजनेला मुहूर्त कधी मिळणार, हा प्रश्न आहे. (वार्ताहर)


वीज कनेक्शन नाही
पाणी पुरवठ्याची केवळ चाचणी घेण्यात आली असली, तरी जलशुध्दीकरण प्रकल्पाला अद्याप वीज वितरणचे अधिकृत कनेक्शन नाही. त्यामुळे स्वच्छ पाण्याची चाचणी अद्याप झालेली नाही. जनरेटरच्या सहाय्याने चाचणी घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आॅर्डर देण्यात आलेल्या पाईप्सही मिळालेल्या नाहीत. त्यासाठी तांत्रिक पूर्तता बाकी आहे.

Web Title: Tasgaon water scheme is incomplete!