सुहास बाबर यांची पहिली टर्म शेवटची ठरू नये, गिरीश महाजन यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 14:35 IST2026-02-05T14:35:20+5:302026-02-05T14:35:50+5:30
मुख्यमंत्र्यांबद्दल एकेरी भाषा वापरणे योग्य नाही

सुहास बाबर यांची पहिली टर्म शेवटची ठरू नये, गिरीश महाजन यांनी दिला इशारा
सांगली : खानापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदेसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत स्थानिक भाजप नेत्यांवर टीका केली. ‘तुझ्या मुख्यमंत्र्याला जाऊन विचार सुहास बाबर कोण,’ असे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर भाजप नेत्यांनी यात एकेरी भाषा वापरल्याचे सांगत बाबर यांच्यावर संताप व्यक्त केला.
याबाबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुंबईत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ‘बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करणे चुकीचे आहे. त्यांच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबर यांना समज द्यावी. त्यांची ही पहली टर्म आहे. ती शेवटची ठरू नये,’ असा इशाराही महाजन यांनी दिला.
वाचा: मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची पात्रता आहे का, गोपीचंद पडळकर यांचा सुहास बाबर यांना सवाल
महाजन म्हणाले, ‘सुहास बाबर ज्या भाषेत बोलतायत ते चुकीचे आहे. मला आश्चर्य वाटलं ते मुख्यमंत्र्यांना एकेरी बोलत आहेत. मीच सर्व पक्ष चालवतो, असे त्यांचे विधानही चुकीचे आहे. त्यांच्या राजकारणाची आता सुरुवात आहे. वर्षभरापूर्वी ते निवडून आले आहेत. लहान असून नवीन आहेत. त्यामुळे त्यांनी अगोदर राजकारण समजून घ्यावे. तोलून मापून त्यांनी बोलायला हवं. नाहीतर पहिलीच टर्म शेवटची ठरू नये.
या सर्व गोष्टींबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहे. त्यांच्या कानावर या गोष्टी घालणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे त्यांच्या पक्षाचे नेते असल्याने त्यांनी अशा प्रकारच्या वक्तव्याबाबत बाबर यांना समज द्यावी.’