Sangli: विद्यार्थ्याने गळफास घेत जीवन संपवले; संतप्त नातेवाइकांनी केली शिक्षकाच्या घराची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 13:26 IST2025-04-12T13:26:16+5:302025-04-12T13:26:45+5:30
शिक्षकाने अपमान केल्याची गावात चर्चा

Sangli: विद्यार्थ्याने गळफास घेत जीवन संपवले; संतप्त नातेवाइकांनी केली शिक्षकाच्या घराची तोडफोड
वाळवा : अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विराज शिवाजी डकरे (वय १७) या विद्यार्थ्याने शुक्रवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याने छताच्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेतला. सकाळच्या सुमारास बडोदा बँकेशेजारी ही घटना घडली.
याबाबत डॉ. प्रवीण धेंडे यांनी वर्दी दिली. दरम्यान, विराजच्या आत्महत्येला जबाबदार असल्याच्या संशयावरून त्याच्या नातेवाइकांनी वाळवा - इस्लामपूर रस्त्यावरील एका शिक्षकाच्या घरावर हल्ला केला. खिडक्या फोडल्या. अंगणात उभी केलेली दुचाकी जमावाने फोडली. घटनेचे गांभीर्य ओळखून आष्टा पोलिसांनीशिक्षकाच्या घरासमोर बंदोबस्त तैनात केला. हल्ल्याबाबत पोलिसांत रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती.
अतिशय हुशार असणाऱ्या विराजने दहावीत ८९ टक्के गुण मिळविले होते. तो वाळव्यातील शाळेत तांत्रिक विभागात शिकत होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे शाळेत गेला. सकाळच्या सत्रात शाळा असल्याने अकरा वाजता घरी आला. त्यानंतर काही वेळातच घरात दुसऱ्या मजल्यावरील खोलीत छताच्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच नातेवाइकांनी आरडाओरडा केला. त्याला अत्यवस्थ अवस्थेत इस्लामपूरला उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
पोलिस बंदोबस्त
विराजने आत्महत्या केल्याचे समजताच शाळेतील सहकारी विद्यार्थ्यांना धक्का बसला. वर्गात एका शिक्षकाने विराजचा अपमान केल्याची चर्चा गावात पसरली. त्यानंतर संतप्त नातेवाइकांनी शिक्षकाच्या घरावर हल्ला केला. बराच वेळ तोडफोड केली. सायंकाळी विराजचा मृतदेह घरी आणण्यात आला. यावेळी मोठी गर्दी झाली होती. विराजच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.