सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवड चार दिवसांवर, पाठिंब्याचे गणित मात्र सुटेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:08 IST2026-03-14T16:08:29+5:302026-03-14T16:08:47+5:30
भाजप एकटा पडत असल्याचे चित्र, अजित पवार गट अध्यक्षपदावर ठाम

सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवड चार दिवसांवर, पाठिंब्याचे गणित मात्र सुटेना
सांगली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवड अवघ्या चार दिवसांवर आलेली असतानाही पाठिंब्याची कोंडी फुटलेली नाही. बहुमतासाठी निर्णायक संख्याबळ असणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेना हे दोन्ही अध्यक्षपदासाठी आक्रमक आहेत. त्यांना भाजप किंवा शरद पवार गटाने अद्याप स्पष्ट होकार दिलेला नसल्याने कोंडी कायम आहे. शेवटच्या दोन दिवसांत निर्णायक हालचाली होण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेनेने पाठिंब्यासाठी सव्वा वर्षे अध्यक्षपदाची अट घातली आहे. पण त्यांना शरद पवार गट किंवा भाजपने जाहीररित्या सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. येत्या बुधवारी (दि. १८) अध्यक्षपदाची निवड होणार आहे, पण राजकीय हालचाली तूर्त थंडच आहेत. अजित पवार गटाने जिल्हास्तरावरील नेतेच निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे, तर शिंदेसेनेचे नेते मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे.
सर्वाधिक १८ संख्याबळ असलेल्या शरद पवार गटाने काँग्रेस ११ सदस्यांच्या मदतीने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्या आहेत. अजित पवार गटाच्या नेत्यांनी अध्यक्षपदाच्या अटीवर आघाडीला जाहीर पाठिंब्याची भूमिका घेतली आहे. या घडामोडीत १६ सदस्यांसह दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष असलेला भाजप मात्र एकटा पडत असल्याचे चित्र आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार गट किंवा शिंदेसेनेला जाहीर आमंत्रण देण्याऐवजी पडद्याआड राजकीय डावपेचांना प्राधान्य दिले आहे. अजित पवार गटाला तर व्हीपचीही भीती घातली आहे. त्यावर या गटाचे नेते माजी खासदार संजय पाटील, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे यांनी पालकमंत्र्यांना आक्रमकरित्या धुडकावून लावले आहे. राज्यातील सत्तेत भाजप युतीचा घटकपक्ष असलेल्या शिंदेसेनेही भाजपला पाठिंब्याविषयी सध्या तरी नकारात्मक भूमिका घेतली आहे. यामुळे राजकीय घडामोडीत भाजप एकटा पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
पाठिंबा द्या, पण श्रेष्ठींना कळवा
अजित पवार गटाच्या नेत्यांनी भाजपला पाठिंब्याविषयी नकारात्मक भूमिका घेतली असली, तरी या विषयावरून जिल्हाध्यक्षांसोबत त्यांचे मतभेद पुढे आले आहेत. पाठिंबा कोणालाही दिला, तरी त्याची माहिती पक्षनेत्यांना द्यायला हवी अशी भूमिका जिल्हाध्यक्षांनी घेतली आहे, तर पाठिंब्याचा निर्णय जिल्हास्तरावरील नेतेच घेतील अशी भूमिका विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, संजय पाटील आदींनी घेतली आहे.
पाठिंब्याविषयी कोणताही निर्णय होणार असला तरी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करूनच तो अंतिम होईल. - निशिकांत पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)