Sangli: चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून पंधरा तोळे सोने केले लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 15:46 IST2025-11-26T15:45:43+5:302025-11-26T15:46:08+5:30
शिराळा : येथील बाह्यवळण रस्त्यावरील सुरेल वस्तीवर सोमवारी, (दि.२४) भर दुपारी एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ...

Sangli: चोरट्यांनी भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून पंधरा तोळे सोने केले लंपास, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शिराळा : येथील बाह्यवळण रस्त्यावरील सुरेल वस्तीवर सोमवारी, (दि.२४) भर दुपारी एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल साडे पंधरा (१५.४०) तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पंचवीस हजार रुपये असा अंदाजे वीस लाख रुपयांचा ऐवज लंपास नेला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
तुकाराम निवृत्ती रोकडे (वय ७६) हे आपल्या पत्नी कमल रोकडे यांच्यासह सुरेल वस्तीवर राहतात. त्यांचा मुलगा विजय रोकडे हे मुंबई येथे कुटुंबासह राहतात. सोमवारी शिराळा येथे बाजार असल्याने तुकाराम रोकडे हे वीज बिल भरण्यासाठी आणि बाजारासाठी दुपारी एक वाजता घराला कुलूप लावून बाहेर पडले होते. जाताना त्यांनी कुलूपाची चावी वऱ्हांड्यात अडकवलेल्या जुन्या कपड्यांमध्ये ठेवली होती. दरम्यान, त्यांची पत्नी कमल रोकडे या शेतात भांगलणीच्या कामासाठी गेल्या होत्या.
रोकडे हे बाजारात असताना त्यांचे जावई दिलीप आनंदा पवार भेटले. दिलीप पवार यांनी 'मी रात्री मुंबईला ट्रॅव्हल्सने जाणार आहे. बाजारातून घेतलेली पिशवी घरात ठेवून येतो,' असे सांगितले. दिलीप पवार घरी गेले असता, त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले आणि ते कोचावर पडलेले होते. त्यांनी लगेच तुकाराम रोकडे यांना याची माहिती दिली.
घरी परत आल्यावर रोकडे यांनी पाहणी केली असता, लोखंडी कपाटातील पाटल्या, मंगळसूत्र, नेकलेस, तीन चेन, पाच अंगठ्या, कर्णफुले आणि इतर दागिने असे एकूण १५.४० तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि रोख २५,००० रुपये असा मोठा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वरुटे करत आहेत.