Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 00:08 IST2025-10-31T00:05:56+5:302025-10-31T00:08:35+5:30
Sangli Breaking news: सांगलीमधील व्हाईट हाऊस हॉटेलच्या बारमध्ये दारू पित असतानाच २५ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. मित्राची त्या करून तरुण फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहे.

Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
Sangli Crime news: विश्रामबाग येथील शंभरफुटी रस्त्यावरील व्हाईट हाऊस हॉटेलच्या बारमध्ये दारू पिताना झालेल्या वादातून निखील रवींद्र साबळे (वय २५, रा. पालवी हॉटेलजवळ, कुपवाड) याचा चाकूने एकाच वारमध्ये गळा चिरून निर्घृण खून करण्यात आला. रात्री साडे सातच्या सुमारास हा खून झाला. खुनानंतर संशयित मित्र प्रसाद दत्तात्रय सुतार (रा. कुपवाड) हा दुचाकीवरून कोल्हापूरच्या दिशेने पसार झाला. रात्री उशिरापर्यंत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस पथक त्याच्या मागावर होते. आर्थिक वाद किंवा अन्य कारणातून खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
मिळालेली माहितीनुसार, निखील साबळे हा विवाहित तरूण असून पूर्वी लक्ष्मी देवळाजवळ त्याचे आईस्क्रीम पार्लर होते. अलिकडे तो पालवी हॉटेलजवळील सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करत होता. आई-वडिल, पत्नी व दोन मुलांसह तो पालवी हॉटेलजवळील अपार्टमेंटमध्ये राहत होता.
संशयित प्रसाद सुतार आणि त्याची ओळख होती. प्रसाद सुतार याचे शंभरफुटी रस्त्यावर व्हाईट हाऊससमोरच ओंकार सर्व्हिसिंग सेंटर आहे. सायंकाळी सातच्या सुमारास तो आणि प्रसाद व्हाईट हाऊसच्या पहिल्या मजल्यावरील बारमध्ये दारू पिण्यास आले होते.
सायंकाळी बार सुरू झाल्यानंतर दोघांशिवाय कोणी ग्राहक नव्हते. दोघांनी कोपऱ्यातील टेबलसमोर दारू पिण्यास सुरूवात केली. काही वेळातच त्यांच्यात वाद झाला. तेव्हा प्रसादने कमरेला लावलेला एका बाजूला दातरे असलेला चाकू बाहेर काढला. निखील याच्या गळ्यावर एकच वार केला. गळ्यावर खोलवर वार झाल्यामुळे प्रचंड रक्तस्त्राव होऊन निखीलचा जागीच मृत्यू झाला.
खुनानंतर प्रसाद चाकू कोचवर टाकून बाहेर पडला. दुचाकी घेऊन तो थेट पळाला. बारमध्ये खून झाल्यानंतर वेटर आणि कामगारांची पळापळ झाली. तत्काळ विश्रामबाग पोलिसांना कळवले. पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव आणि पथक घटनास्थळी धावले. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहायक निरीक्षक पंकज पवार आणि पथकही दाखल झाले.
उपअधीक्षक प्रणिल गिल्डाही तत्काळ आले. मृताची ओळख तत्काळ पटली नाही. परंतू संशयित प्रसाद याचे हॉटेलसमोरच सर्व्हिसिंग सेंटर असल्यामुळे त्याला काहीजण ओळखत होते. त्याची माहिती काढत असताना मृताचे नाव निखील साबळे असल्याचे समजले. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना तपासाबाबत सूचना दिल्या.
खुनानंतर प्रसाद सुतार हा कोल्हापूरच्या दिशेने दुचाकीवरून पसार झाल्याचे समजताच पोलिस पथक त्याच्या मागावर होते. त्याच्या अटकेनंतरच खुनाचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आर्थिक वाद किंवा अन्य कारणाची चर्चा रंगली होती.
एकाच हॉटेलमध्ये खुनी हल्ला अन् खून
संशयित प्रसाद सुतार हा सर्व्हिसिंग सेंटर चालवत होता. २०२३ मध्ये त्याने व्हाईट हाऊसमध्ये एकावर खुनी हल्ला केला होता. त्याच्यावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. आता त्याने व्हाईट हाऊसमध्येच मित्राचा खून केल्याने याची चर्चा रंगली होती.
वेश्या व्यवसाय अन् आता खून
काही दिवसापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाने ऑगस्ट महिन्यात कारवाई केली होती. लॉज चालक विनायक सरवदे याच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला होता. आता बारमध्ये खून झाल्यामुळे व्हाऊस हाऊसमधील कृत्याची चर्चा रंगली आहे. पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी याची दखल घेत कारवाईच्या सूचना दिल्या.
रात्री उशिरापर्यंत पोलिस मागावर
खुनानंतर संशयित प्रसाद सुतार हा कोल्हापूरच्या दिशेने पसार झाल्यानंतर गुन्हे अन्वेषणचे उपनिरीक्षक कुमार पाटील आणि पथक मागावर होते. त्याला ताब्यात घेऊन खुनाचा छडा लावला जाईल असे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सांगितले.