Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 09:43 IST2025-11-24T09:42:19+5:302025-11-24T09:43:48+5:30
Sangli Hit And Run: सांगलीमध्ये नशेत कार चालवत असलेल्या एका व्यक्तीने दुचाकींसह सहा वाहने उडवली. यात अनेक जण जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
सांगलीमध्ये हिट अँड रनची घटना घडली आहे. नशेत असलेल्या एका व्यक्तीने रस्त्याच्या चुकीच्या बाजूने कार चालवत सहा वाहनांना धडक दिली. यात सहा ते सात जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कारचालक पळून जात होता. लोकांनी त्याचा पाठलाग केला. पकडून त्याला चोप दिला. तसेच दगडांनी त्याची कारही फोडली.
सांगली शहरातील कल्पतरू मंगल कार्यालय ते रेल्वे स्थानक रस्त्यावर ही घटना घडली. मद्यधूंद व्यक्ती राँग साईडने वेगात कार चालवत निघाला होता.
समोरून येणाऱ्या वाहनांना धडक
ही घटना रविवारी (२३ नोव्हेंबर) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. मद्यधूंद अवस्थेत असलेली व्यक्ती स्कोडा कारने निघाली होती. कॉलेज कार्नर ते कल्पतरू मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून तो जात होता.
नशेत कारचालकाने समोर येणाऱ्या वाहनांना धडक दिली. दुचाकींसह सहा वाहनांना धडक देत, तो भरधाव निघाला होता. धडकेमध्ये काही कार आणि दुचाकींचे नुकसान झाले, तर सहा ते सात जण जखमी झाले.
एअर बँगमुळे वाचला चालक
जोरात धडक दिल्यानंतर कारमधील एअर बँग उघडल्या, त्यामुळे कारचालक थोडक्यात वाचला. मात्र, अपघातानंतर तो पळून जात होता. लोकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्याला पाठलाग करून पकडले. लोकांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्याचबरोबर त्याची स्कोडा कारही दगडांनी फोडली.
दरम्यान, याबद्दलची माहिती मिळताच विश्रामबाग पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने जखमींना रुग्णालयात दाखल केले, तर लोकांच्या तावडीत सापडलेल्या आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणाचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.