वाळू तस्करांनी कोट्यवधीचा महसूल बुडवला

By Admin | Updated: September 22, 2015 23:25 IST2015-09-22T23:09:26+5:302015-09-22T23:25:46+5:30

विक्रम सावंत : जत तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे पितळ उघडे करणार

Sand smugglers sank billions of revenue | वाळू तस्करांनी कोट्यवधीचा महसूल बुडवला

वाळू तस्करांनी कोट्यवधीचा महसूल बुडवला

जत : प्रशासनाच्या आशीर्वादाने जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू झाले आहेत. एका वर्षापूर्वी बंद असणारा मटका, गावठी दारू, गांजा, चंदन, वाळू तस्करी हे व्यवसाय आता खुलेआम सुरू झाले आहेत. बेकायदेशीर व्यवसायांना लोकप्रतिनिधी पाठीशी घालत आहेत. अवैध लाभ मिळविण्याची नवी पद्धत आता तालुक्यात सुरू झाली आहे. हे सर्व अनधिकृत व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी जिल्हा बॅँकेचे संचालक विक्रम सावंत यांनी केली आहे.जत व उमदी पोलीस आणि महसूल अधिकारी बेकायदेशीर व्यवसायाला अभय देत आहेत. त्यातून कर्मचारी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळत आहे. मटका व्यवसायामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण वाममार्गाला लागत आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यापैकी काहीजणांनी आत्महत्या केली आहे. परंतु पोलीस खाते अडचणीत येईल म्हणून त्याची नोंद पोलिसात केली जात नाही.
तालुक्यात दरीबडची व पाच्छापूर येथील गांजा उत्पादक शेतकरी आणि रावळगुंडवाडी येथील चंदन तस्कर येथे छापा घालून पोलिसांनी कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वेगळे आहेत. या प्रकरणात कोतवाल, तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदार आणि पोलीस खाते सहभागी आहे. याचे पुरावे आहेत. यासंदर्भात या सर्वांचे पितळ आम्ही लवकरच उघडे पाडणार आहोत, असा इशारा सावंत यांनी दिला. (वार्ताहर)

Web Title: Sand smugglers sank billions of revenue