Sangli: राजेवाडीतील सद्गुरू साखर कारखान्यात तोडफोड, फिर्यादीसह सुरक्षारक्षकास जमावाकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 17:49 IST2025-10-18T17:49:24+5:302025-10-18T17:49:47+5:30
घटनेनंतर कारखाना परिसरात काही काळ तणावाचे वातावरण

Sangli: राजेवाडीतील सद्गुरू साखर कारखान्यात तोडफोड, फिर्यादीसह सुरक्षारक्षकास जमावाकडून मारहाण
आटपाडी : राजेवाडी (ता. मिरज) येथील श्री.श्री. सद्गुरू साखर कारखान्यात मंगळवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अनोळखी १० ते १५ जणांच्या जमावाने तोडफोड करत मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची घटना घडली आहे.
याबाबत महादेव वसंत बोडरे (वय ५२, रा. अधिकारी कॉलनी, श्री.श्री. साखर कारखाना राजेवाडी, मूळ रा. निमगाव मगर, ता. माळशिरस) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रात्रीच्या वेळी अनोळखी जमावाने कारखान्याच्या परिसरात घुसून डीएस कंट्रोल रूम, वे-ब्रिज ऑफिस, टाइम ऑफिस, सर्व्हर रूम, सिक्युरिटी गेट ऑफिस आणि शेतकी विभागातील इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर, खिडक्या-दरवाजांची तोडफोड केली. या तोडफोडीत कारखान्याचे अंदाजे ४५ ते ५० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
यावेळी फिर्यादीसह सुरक्षा रक्षक बापू केंगार आणि कुंडलिक बोडरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाणही करण्यात आली. या घटनेनंतर कारखाना परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच आटपाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी अनोळखी १० ते १५ इसमांविरुद्ध बीएनएस कलम ३३३, ३५२, ३५१(२), ३२४(५), १८९(२), १९०, १९१(३) तसेच मुंबई पोलिस अधिनियम कलम १३५ व फौजदारी सुधारणा कायदा कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास आटपाडी पोलिस करत आहेत.