सांगली जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली, दुष्काळी तालुक्यातही कोसळल्या सरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:05 IST2025-07-02T19:05:35+5:302025-07-02T19:05:54+5:30

धरण, तलावही ५० ते ७० टक्के भरले

Rainfall in Sangli district exceeded average in June itself | सांगली जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली, दुष्काळी तालुक्यातही कोसळल्या सरी

सांगली जिल्ह्यात जून महिन्यातच पावसाने सरासरी ओलांडली, दुष्काळी तालुक्यातही कोसळल्या सरी

सांगली : देशात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला. त्यानंतर वेळेपूर्वीच संपूर्ण मान्सून जिल्ह्यात पोहचला. यंदा मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला होता. त्यानंतर जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. जून महिन्याचा सरासरी १२९ मिलीमीटर पाऊस असून प्रत्यक्षात १५५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. महिन्यात १२० टक्के पाऊस झाल्याची पाटबंधारे विभागाकडे नोंद आहे. जिल्ह्यातील धरण, तलावही ५० ते ७० टक्के भरले आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात जून महिन्यात सरासरी १२९ मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात यावर्षी १ ते ३० जूनपर्यंत जिल्ह्यात १५५ मिलीमीटर पाऊस जास्त झाला आहे. जून महिन्यात १२० टक्के पाऊस झाल्यामुळे शेतकरी समाधानी आहे. जून महिन्यात ३० दिवसांपैकी २५ दिवस अखंडित पाऊस झाला आहे. सततच्या पावसामुळे खरीप हंगामामध्ये केवळ ६५ टक्केपर्यंतच पेरणी झाली आहे.

दुष्काळी आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यातही सरासरीच्या ९० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यात २०० टक्केहून अधिक तर कवठेमहांकाळ, कडेगाव, आटपाडी तालुक्यात १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

जुलैमध्येही पावसाचा जोर

जून महिन्यात देशात सरासरी ओलांडणाऱ्या पावसाचा जोर जुलै महिन्यात कायमच राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.

तालुकानिहाय १ ते ३० जूनचा पाऊस

तालुका - पाऊस (मिलीमीटर) - टक्के

मिरज - १११.२  - ९५
जत - ८५.७ -  ९३
खानापूर - ९२.४  - ८१.६
वाळवा - २०१.५  - २०१.५
तासगाव - १०७.५  - ९४
शिराळा - ४५१.१ - २२८.८
आटपाडी - ८५  - १०८.६
क.महांकाळ - ९१ - १०५.२
पलूस - १७०.६ - २२०.१
कडेगाव - १४२.४ - १०७.६
एकूण - १५५ - १२०.२

३० पैकी २५ दिवस पाऊस

जून २०२५ महिन्यातील ३० दिवसांपैकी २५ दिवस अखंडित पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या शेतीमध्ये पाणी साचून राहिले आहे. ओलीमुळे पेरणीच शेतकऱ्यांना करता आली नाही. म्हणूनच जिल्ह्याची पेरणी केवळ ६५ टक्केपर्यंतच थांबली आहे.

गतवर्षीपेक्षा ५५.३ टक्के कमी पाऊस

पाटबंधारे आणि महसूल विभागाच्या आकडेवारीनुसार जून २०२४ मध्ये १ ते ३० जूनपर्यंत २२६.२ मिलीमीटर पाऊस झाला होता. टक्केवारीत म्हटले तर सरासरीच्या १७५.३ टक्के पाऊस झाला होता. यावर्षी जून २०२५ मध्ये १ ते ३० जूनपर्यंत १५५ मिलीमीटर पाऊस झाला असून १२० टक्के पाऊस झाला आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५५.३ मिलीमीटर पाऊस कमीच झाला आहे. गतवर्षी धोधो पाऊस कोसळत होता. पण, यावर्षी रिमझिम पाऊस सतत होत आहे.

Web Title: Rainfall in Sangli district exceeded average in June itself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.