घनकचरा आराखड्यासाठी आता सल्लागार

By Admin | Updated: June 14, 2015 00:03 IST2015-06-14T00:03:25+5:302015-06-14T00:03:25+5:30

निविदा मागविणार : पुढील आठवड्यात महापालिकेकडून कार्यवाही

Now the consultant for solid waste planning | घनकचरा आराखड्यासाठी आता सल्लागार

घनकचरा आराखड्यासाठी आता सल्लागार

सांगली : घनकचऱ्याचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्याची शिफारस तांत्रिक समितीने केली आहे. त्यानुसार शासन यादीवरील चौदा कंपन्यांशी महापालिका संपर्क साधणार आहे. प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी जाहीर निविदा मागवून सल्लागार कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे. पुढील आठवड्यात ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
पंधरा वर्षांत महापालिकेने घनकचरा प्रकल्प राबविला नसल्याने जिल्हा सुधार समितीने हरित न्यायालयात धाव घेतली होती. हरित न्यायालयाने घनकचरा प्रकल्पासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील गोखले इन्स्टिट्यूट आॅफ कॉमर्स, मुंबईतील आयआयटी व सांगलीतील वालचंद महाविद्यालयातील तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. एका ठिकाणी कचरा साठविणे व वर्गीकरण करणे, दुसऱ्या ठिकाणी सेंद्रीय खत निर्मिती करावयाची आहे. प्रकल्प आराखड्यासह कंपन्यांची नियुक्ती व कायदेशीर, तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने ३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.
आयआयटी, वालचंद व गोखले इन्स्टिट्यूट या समितीची पहिली बैठक गेल्या महिन्यात झाली. आता तांत्रिक समितीने महापालिकेला प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्याची सूचना केली आहे. शासनाच्या यादीवरील चौदा कंपन्या घनकचऱ्याचा आराखडा तयार करतात. या कंपन्यांपैकी एकाची नियुक्ती केली जाणार आहे.
कमीत कमी दरात प्रकल्प आराखडा तयार करणाऱ्या कंपनीला काम देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी पुढील आठवड्यात निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: Now the consultant for solid waste planning