Sangli Crime: लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांवर खुनी हल्ला, बापाला वाचवताना मुलीचे बोट तुटले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:31 IST2025-11-17T14:31:34+5:302025-11-17T14:31:59+5:30
हल्ला करून संशयित पसार; गावात खळबळ

Sangli Crime: लग्नास नकार दिल्याने मुलीच्या वडिलांवर खुनी हल्ला, बापाला वाचवताना मुलीचे बोट तुटले
मिरज : मिरज तालुक्यातील एका गावात लग्नास नकार दिल्याच्या कारणातून अक्षय सुभाष पाटील (वय २४, रा. टाकळी, ता. मिरज) या तरुणाने मुलीच्या वडिलांवर खुरप्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. वडिलांना वाचविण्यासाठी धावून आलेल्या मुलीच्या हातावर वार झाल्याने तिचे एक बोट पूर्णपणे तुटले. दोघांवर सध्या मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अक्षय पाटील याने तालुक्यातील एका गावातील मुलीच्या बापाकडे मुलीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, मुलीच्या बापाने ही मागणी नाकारली. रविवारी सायंकाळी मुलीचा साखरपुडा दुसऱ्या तरुणासोबत ठरला होता. याबाबत नातेवाईक व गावकऱ्यांनी अक्षय पाटील याची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला होता. लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातून अक्षय पाटील याने एका बॅगेत खुरपे लपवून रविवारी सकाळी मुलीच्या घराजवळ येऊन तिच्या बापावर अचानक हल्ला केला.
बापावर खुरप्याने वार झाल्याने वडिलांना वाचवण्यासाठी मुलगी पुढे आली. यावेळी मुलीच्या डाव्या हातावर खुरप्याचा वार बसून तिचे एक बोट तुटले. हल्ल्यानंतर अक्षय तेथून पसार झाला. जखमी बाप लेकीस तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल केले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजित सिद व पोलिस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले. आरोपी अक्षय पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
हल्ला करून संशयित पसार; गावात खळबळ
मुलीच्या बापावर हल्ला करून अक्षय पाटील हा तेथून पसार झाल्याची माहिती मिळाली. जखमी बाप व लेकीस उपचारासाठी मिरज सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली होती.