Sangli Crime: विट्यात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा म्हसवडचा आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 16:29 IST2025-11-25T16:29:33+5:302025-11-25T16:29:49+5:30
नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ही कारवाई झाल्याने शहरात खळबळ उडाली

Sangli Crime: विट्यात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणारा म्हसवडचा आरोपी जेरबंद
विटा : विनापरवाना बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल स्वत:जवळ बाळगल्याप्रकरणी रणजित प्रल्हाद सरतापे (वय ३४, रा. म्हसवड, ता.माण, सध्या रा. औंध, ता. खटाव, जि. सातारा) यास पोलिसांनी अटक केली. यावेळी त्याच्या ताब्यातील ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल व दुचाकी असा एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला. विटा येथील शाहूनगर येथे पोलिसांनी ही कारवाई केली. नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ही कारवाई झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सातारा जिल्ह्यातील म्हसवड (ता. माण) येथील संशयित रणजित सरतापे हा विनापरवाना बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन विटा येथील नेवरी रस्त्यावरील शाहूनगर फलकाजवळ थांबला असल्याची माहिती विटा पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकातील राजेंद्र भिंगारदेवे व श्रीकृष्ण सरगर यांना मिळाल्यानंतर पथकाने शाहूनगर येथे सापळा लावला.
विट्याचे पोलिस उपअधीक्षक विपुल पाटील व पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण विभागातील हवालदार अमोल पाटील, राजेंद्र भिंगारदेवे, सचिन खाडे, उत्तम माळी, दिग्विजय कराळे, हेमंत तांबेवाघ, किरण पाटील, अमोल कदम, महेश देशमुख, अक्षय जगदाळे, श्रीकृष्ण सरगर, आदेश केदार, रमेश कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बनावट पिस्तूल, दुचाकी ताब्यात
पोलिस आल्याची माहिती मिळताच संशयित सरतापे याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल सापडले. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून देशी बनावटीचे पिस्तूल व दुचाकी असा सुमारे एक लाखाचा मुद्देमाल जप्त केला.