हजरजबाबीपणा, चिमटे अन् खेचाखेची; सांगलीत अजितदादांच्या आठवणी ताज्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:57 IST2026-01-29T17:56:12+5:302026-01-29T17:57:16+5:30
Ajit Pawar Passed Away: कधी कधी ईर्ष्येतून चांगले घडत असते

हजरजबाबीपणा, चिमटे अन् खेचाखेची; सांगलीत अजितदादांच्या आठवणी ताज्या
सांगली : प्रदीर्घ काळ सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रभाव राहिला. बुधवारी त्यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय पटलावरील अनेक प्रसंगांचा कोलाज यानिमित्ताने तयार झाला. येथील अनेक सभा त्यांनी गाजविल्या. स्थानिक व राज्यस्तरीय नेत्यांना चिमटे घेत फुलविलेली अनेक भाषणे जिल्ह्यात नोंदली. मात्र, या सर्वांत आष्टा येथील गाजलेले एक भाषण यानिमित्ताने पटलावर चर्चेत आले. या भाषणात त्यांनी सर्वांना खळखळून हसविले होते.
आष्टा येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमास त्यावेळी आमदार जयंत पाटील व दिवंगत नेते आर. आर. पाटीलही उपस्थित होते. कार्यक्रमास पवार तीन तास उशिरा आले होते. त्यावर ते म्हणाले होते, मला उशीर झाला ते बरेच झाले. त्यानिमित्ताने आर. आर. पाटील व जयंत पाटील यांना एक तास संवाद साधता आला, हे काय थोडे आहे! वेळेत पोहोचलो असतो, पण कधी नव्हे ती संधी मिळालेल्या पृथ्वीराज देशमुखांनी गावोगावी अडवून सत्कार घेतल्याने खरा उशीर झाला.
वाचा: मदन, तुझा अन् माझा स्वभाव जुळतो, तू माझ्यासोबत ये!, अजितदादांच्या आठवणींनी कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले
येथील सैनिक शाळेच्या विषयावरही त्यांनी अण्णासाहेब डांगे आणि आर. आर. पाटील यांना छेडले होते. डांगे यांच्याकडे पाहत ते म्हणाले होते, शासनाकडून मंजूर झालेली सैनिक शाळा आष्ट्यातून तासगावला गेली, ही गोष्ट तुमच्या जिव्हारी लागलेली दिसते. तासगावला शाळा गेली तरी ईर्ष्येतून तुम्ही दुसरी सैनिक शाळा उभी केली. कधी कधी ईर्ष्येतून चांगले घडत असते.
एकीकडे स्थानिक विषयांवर चिमटे घेताना अजित पवारांनी त्यावेळी विलासराव देशमुखांसह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांवरही टीका केली होती. महागाईच्या प्रश्नावर काहींनी आम्हाला सल्ला दिला. आम्ही सल्ले देण्यापेक्षा कृतीवर भर देतो. उचलली जीभ की लावली टाळ्याला, अशी आमच्या मंत्रिमंडळाची गत आहे.
वाचा: बहिणीच्या सासूरवाडीशी अजित पवारांनी जपले होते जिव्हाळ्याचे नाते
येथील संकुलात वृक्षारोपण करताना मला अशोकाच्या झाडाची आठवण झाली. त्यावेळी मी गमतीने अशोकाच्या झाडावर टीका केली तर त्याचा संबंध अशोक चव्हाण यांच्याशी जोडला गेला. त्यांच्या या वाक्यानंतर उपस्थितांसह आर. आर. पाटील व जयंत पाटील खळखळून हसले होते.
स्त्री भ्रूणहत्येवर पोटतिडकीने काही मते मांडत त्यांनी सांगली जिल्ह्यातील मुलींची संख्या कमी असलेल्या तालुक्यांची नावे वाचली. त्यांनी पलूस, वाळवा अशी नावे वाचली. मात्र, अरे, हे कोणी दिले माझ्या हाती, असे म्हणत त्यांनी वाचन थांबविले. त्यावेळी दोन्ही मंत्र्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता.