सांगलीत मोबाइल शॉपीला भीषण आग, एक कोटीचे साहित्य जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:55 IST2025-11-27T16:53:40+5:302025-11-27T16:55:01+5:30
तासभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले

सांगलीत मोबाइल शॉपीला भीषण आग, एक कोटीचे साहित्य जळून खाक
सांगली : शहरातील आझाद चौकातील शिव मेरिडियन व्यापारी संकुलातील नवतरंग मोबाइल शोरूमला गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, लाखोंचे एलईडी स्क्रीन असे एक कोटी रुपयांचे साहित्य जळून खाक झाले.
महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तासाभराच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. ही आग इन्व्हर्टर शॉर्टसर्किटमुळे लागण्याचा प्राथमिक अंदाज असून, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिव मेरिडियन संकुलात अनेक मोबाइल व ॲक्सेसरिज विक्रीची दुकाने, हाॅटेल, फायनान्स कंपन्यांची कार्यालये आहेत. याच इमारती पहिल्या मजल्यावर वीरेंद्र यड्रावे यांच्या मालकीचे अण्णाज नवतरंग मोबाइल शॉपी नावाने मोबाइलचे दुकान आहे. गुरुवारी पहाटे साडेचारच्या सुमारास अचानक दुकानाच्या पहिल्या मजल्यातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले. ही बाब हाॅटेल कर्मचारी व वाॅचमन नजीर हुसेन मुलाणी यांनी पाहिली. त्यांनी तातडीने दुकान मालक आणि महापालिकेच्या अग्निशमन पथकाला आगीची माहिती दिली.
महापालिकेच्या अग्निशमनच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन विभागाचे प्रमुख सुनील माळी, फायरमन धीरज पावणे, प्रसाद माने, अण्णासाहेब देशमुख, ओंकार ऐतवडे, उमेश सरवदे, देविदास मानकरी, विजय कांबळे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तासभराच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
या आगीत दुकानाच्या पहिल्या मजल्यावर रेडमी कंपनीचे १२० मोबाइल, चार संगणक, लॅपटॉप, सोफासेट, दुकानाच्या दर्शनी भागात असलेला ९ लाखांचा एलईडी स्क्रीन, दुकानावरील एलईडी बोर्ड यासह इतर साहित्य भक्षस्थानी पडले होते. आगीत एक कोटीचे नुकसान झाले असून, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.