सुरुलमध्ये महिलेचा अज्ञाताकडून खून

By Admin | Updated: December 22, 2016 23:50 IST2016-12-22T23:50:32+5:302016-12-22T23:50:32+5:30

डोक्यात हातोडा घातला : दागिने, रोकड ‘जैसे थे’

Initially the blood of the woman from the unknown | सुरुलमध्ये महिलेचा अज्ञाताकडून खून

सुरुलमध्ये महिलेचा अज्ञाताकडून खून

इस्लामपूर : सुरुल (ता. वाळवा) येथे शेतवस्तीवरील घरी एकट्याच राहणाऱ्या महिलेचा खून झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. कमल महादेव पाटील (वय ५८, रा. सुरुल) असे तिचे नाव आहे. बुधवारी रात्री ते पहाटे दरम्यान हा खून झाला. अज्ञाताने डोक्यात लोखंडी हातोडा व दगड घालून खून केला असून, कारणही अज्ञातच आहे. मृत महिलेच्या अंगावरील दागिने व घरातील रोख रक्कम सुरक्षित होती. त्यामुळे खुनाचे गूढ वाढले आहे.
कमल पाटील सुरुलच्या मळी नावाच्या शेतातील घरात राहत होत्या. सुरुल हे त्यांचे माहेर, तर करमाळे (ता. शिराळा) हे सासर आहे. पती महादेव पाटील यांच्या निधनानंतर त्या सुरुल येथे स्थायिक झाल्या. त्यांना शंकर नावाचा मुलगा होता. त्याने दोन लग्ने केली होती. त्याच्या दुसऱ्या पत्नीबरोबर मृत कमल पाटील यांची कुरबूर होत असे. त्यामुळे भाऊ सर्जेराव पाटील यांच्या शेतातील घरी कमल राहत होत्या. मुलगा शंकर याचेही आठ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वस्तीशेजारील चुलत चुलते प्रकाश राजाराम पाटील यांनी मोबाईलवरून कमल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती भाचा अभिजित याला दिली. त्यानंतर पाटील कुटुंबीयांनी वस्तीवर येऊन पाहिल्यानंतर ही खुनाची घटना उघडकीस आली. भाचा अभिजित पाटील याने पोलिसांत अज्ञाताविरुद्ध खुनाची फिर्याद दिली आहे. (वार्ताहर)
श्वानाकडून मागाचा प्रयत्न
कमल पाटील यांच्या खुनातील संशयिताचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सांगलीच्या श्वानपथकाला पाचारण केले होते. घटनास्थळावरील लोखंडी हातोड्याचा वास दिल्यानंतर हे श्वान सुरुल गावच्या दिशेने ओढ्यापर्यंत ५0 मीटर अंतरावर जाऊन तेथेच घुटमळले.

Web Title: Initially the blood of the woman from the unknown