रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ; अपुरी कामे, भरधाव वेग कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:25 IST2025-04-17T18:23:37+5:302025-04-17T18:25:03+5:30
महेश देसाई कवठेमहांकाळ : रत्नागिरी- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीत दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. तालुक्यात राष्ट्रीय मार्गावर ...

रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अपघातांच्या संख्येत वाढ; अपुरी कामे, भरधाव वेग कारणीभूत
महेश देसाई
कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीत दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढत आहे. तालुक्यात राष्ट्रीय मार्गावर घोरपडी ते खरशिंग फाट्यादरम्यान अनेकांना अपघातात जीव गमवावा लागला आहे. तर छोट्या मोठ्या अपघातात शेकडो जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग हा कवठेमहांकाळ तालुक्यात मृत्यूचा सापळा बनला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर असलेली अपुरी कामे तसेच भरधाव वेग, नियम मोडण्यासारख्या मानवी चुका अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. वाहतुकीचे नियम मोडण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे अपघातात वाढ होत आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाची लांबी खरशिंग फाटा ते घोरपडी दरम्यान ३५ किलोमीटर इतकी आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कवठेमहांकाळ तालुक्यातील हद्दीतील खरशिंग ते घोरपडी दरम्यान अपघाताची संख्या वाढली आहे.
बहुतांश अपघातांमागे अतिवेगाने वाहन चालविणे हे प्रमुख कारण आढळून आले आहे. वेगाची मर्यादा न राखणे हेही त्यातील एक कारण आहे. महामार्ग प्रशासनाकडून अपघाताची ठिकाणे व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना काही ठिकाणी केल्या नाहीत. वाहनधारकांना महामार्गावर आवश्यक त्या सोयीसुविधाही दिल्या जात नाहीत. मात्र, दुसरीकडे बोरगाव येथे नित्यनियमाने टोल वसुली मात्र जोमाने केली जात आहे.
अपघातात वाढ
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी रात्री अपघातात म्हैसाळमधील तीन महिला मजूर ठार झाल्या तर अनेक जण लहान मुलासह गंभीर जखमी झाले. हा अपघात ट्रक चालकाने भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन चालवल्याने झाला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
उपाययोजनांचा अभाव
पंढरपूर, तुळजापूर तसेच अक्कलकोट, कोल्हापूर येथील महालक्ष्मी, गणपतीपुळेला जाणारे लाखो भाविक या रत्नागिरी-नागपूर महामार्गाचा वापर करतात. वाहनांसोबतच पायी जाणारे भाविक, दिंड्यांची संख्याही या मार्गावर मोठी आहे. महामार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा अभाव प्रशासनाकडून पाहावयास मिळत आहे.
चारचाकी वाहने अति वेगाने वाहनधारक चालवतात, तर दुचाकीचालक हेल्मेटचा वापर करीत नाहीत. ग्रामीण भागातील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाचे नियम अजून माहिती नाहीत. ते रस्त्याच्या विरोधी दिशेने जात असतात. वाहनधारकांनी नियम पाळणे गरजेचे. -श्रीकृष्ण नवले, सहायक पोलिस निरीक्षक, महामार्ग वाहतूक पोलिस ठाणे, कवठेमहांकाळ.