देवराष्ट्रेत उत्स्फूर्त गाव बंद आंदोलन

By Admin | Updated: February 4, 2015 00:02 IST2015-02-03T23:11:02+5:302015-02-04T00:02:04+5:30

दिवसभर व्यवहार ठप्प : ‘आदर्श गाव’ कामे रखडली

Improper village shut movement in Devrajteet | देवराष्ट्रेत उत्स्फूर्त गाव बंद आंदोलन

देवराष्ट्रेत उत्स्फूर्त गाव बंद आंदोलन

कडेगाव : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीनिमित्त आदर्श गाव योजनेंतर्गत देवराष्ट्रेत झालेल्या कोट्यवधींच्या विकास कामांतील अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. या कामांची चौकशी व्हावी, रखडलेली कामे त्वरित पूर्ण व्हावीत, नागरिकांनी केलेले अतिक्रमण काढून टाकावे, अशा मागण्यांसाठी आज मंगळवारी देवराष्ट्रे गाव बंद ठेवून आंदोलन केले.
यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीच्या निमित्ताने शासनाने देवराष्ट्रे गाव आदर्श गाव साकारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासनाने जवळपास १८ कोटी रुपयांचा निधी दिला. परंतु येथे झालेली विकास कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. गटारीच नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावरुन वहात आहे. पाणी योजनेच्या नूतनीकरणासाठी १ कोटी ६१ लाख रुपये खर्चूनही पुरेसे पाणी मिळत नाही. या कामाचीही चौकशी करावी, अशी मागणी देवराष्ट्रेतील ग्रामस्थांनी केली आहे. शासनाचे अधिकारी मात्र दररोज २ लाख ४ हजार लिटर पाणी पुरवठा होत असल्याचा दावा करीत आहेत. तसेच हे पाणी जाते कुठे? असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. देवराष्ट्रे येथील अनेक ग्रामस्थांचे अतिक्रमण काढले आहे. परंतु काही ग्रामस्थांनी आडमुठेपणाने अद्याप आपले अतिक्रमण काढून घेतलेले नाही. अशी अतिक्रमणे शासनाने तातडीने काढावीत, अशा विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार किरण भिसे यांना देवराष्ट्रेतील ग्रामस्थांनी दिले. यावेळी बी. टी. महिंद, आर. वाय. पाटील, आनंदराव मोरे, ग्रा. पं. सदस्य प्रमोद गावडे, उपसरपंच भानुदास शिरतोडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Improper village shut movement in Devrajteet