टीका कराल तर त्याच भाषेत उत्तर देऊ - गोपीचंद पडळकर; बहुजनांना भाजपने सोबत घेतल्यानेच विरोधकांना पोटशूळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:52 IST2025-10-03T17:51:59+5:302025-10-03T17:52:17+5:30
सभेला येण्यापूर्वी राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना केली. माझी इच्छा नव्हती; मात्र चंद्रकांतदादांनी आदेश दिला

टीका कराल तर त्याच भाषेत उत्तर देऊ - गोपीचंद पडळकर; बहुजनांना भाजपने सोबत घेतल्यानेच विरोधकांना पोटशूळ
सांगली : सभेला येण्यापूर्वी राजारामबापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर प्रार्थना केली. माझी इच्छा नव्हती; मात्र चंद्रकांतदादांनी आदेश दिला. या मुलाला सद्बुद्धी द्या. नारदमुनी आहे. कळ लावतो. मला तुम्ही शिव्या दिल्या. मी बोलल्यावर मुख्यमंत्र्यांना फोन केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अरे, तुरे बोललेले चालणार नाही. मी अशा ऐऱ्यागैऱ्यांच्या धमकीला भीक घालत नाही, आमच्या नेतृत्वावर टीका कराल तर मी संस्कृतीचा विचार करणार नाही, अशा शब्दात ‘भाजप’चे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
सांगलीत राष्ट्रवादीच्या संस्कृती बचाव मोर्चात भाजपच्यावतीने इशारा सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत पडळकर बोलत होते. सभेला पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सत्यजित देशमुख, सदाभाऊ खोत, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी खासदार अमर साबळे, पृथ्वीराज देशमुख, संग्राम देशमुख, नीता केळकर, प्रकाश ढंग, शेखर इनामदार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
पडळकर म्हणाले की, मराठा समाजासाठी सारथी संस्था सुरू केली. ओबीसीसाठी वेगळे मंत्रालय स्थापन केले. विविध समाजाची १८ महामंडळे उभारली. हे काम गेल्या ६० वर्षांत शरद पवार, जयंत पाटील यांनाही जमलेले नाही. बहुजनांना भाजप सोबत घेऊन जात आहे. हेच तुम्हाला रुचलेले नाही. १९९९ पासून पक्षाचा एकच अध्यक्ष, पक्ष फुटला तर पुतण्या अध्यक्ष अशी स्थिती भाजपमध्ये नाही.
फडणवीस, मोदी यांच्यावर खालच्या पटीत बोलाल तर त्याच पद्धतीने उत्तर देणार. मला नडायचे नाही. माझा दुखवण्याचा हेतू नव्हता; पण इस्लामपूरचे ईश्वरपूर झाल्यापासून ते बिथरले आहेत. ते हिंदूविरोधी आहेत. एका समाजाला शिव्या देता, ही कुठली संस्कृती? आता हे खपवून घेणार नाही. मला शिव्या देत असेल तर त्यावर महाराष्ट्रात चर्चा का झाली नाही. मीही लोकांतून निवडून आलो आहे. मला शिव्या देणार असाल तर मी तुम्हाला साहेब कसे म्हणणार? एका बाजूने संस्कार होणार नाही. तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन टीका कराल तर दुपटीने खाली जाऊन टीका करणारच.
काँग्रेस-राष्ट्रवादीतील प्रस्थापित १२५ घराणी म्हणजे महाराष्ट्र नव्हे. राज्यात अठरापगड जाती आहेत. बाराबलुतेदार, गावगाड्यातील गरीब मराठा, माळी, लिंगायत, कुणबी, ३२६ पेक्षाजास्त जाती असलेला ओबीसी समाज आहे. या समाजाचा प्रस्थापित नेत्यांनी कधी विचार केला का? केवळ ब्राह्मणांना शिव्या देणे, ही यांची संस्कृती आहे. माझे हातपाय तोडण्याची भाषा करणाऱ्यांनी मी कुठे यायचे ते सांगावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
कोण काय म्हणाले?
सदाभाऊ खोत : माझ्यावर २६५ गुन्हे आहेत. दिलीप पाटील तुमच्यावर किती गुन्हे आहेत, हे सांगता काय? तुम्हाला वाड्यावर जाऊन कारखान्याचे संचालक पद मिळाले. जिल्हा बँक मिळाली, तुम्ही कधी जिल्हा परिषदेची निवडणूक तरी लढली आहे का? मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. माझ्या वाट्याला जाल तर तुमचे वाडे उद्ध्वस्त करू. राष्ट्रवादी पक्ष नसून गुंडांची लुटारुंची टोळी आहे.
समित कदम : गोपीचंद पडळकर एकटे नाहीत, आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत. नेत्यांची आई-वडील, पत्नी यांच्यावर टीकाटिप्पणी करणे ही कसली संस्कृती? यापुढे टीका कराल तर तुम्ही सांगा, तिथे आम्ही दोघेच येऊ, तिसऱ्याची गरज नाही.
आमदार सुधीर गाडगीळ : मोदी-फडणवीस यांच्या शरीरयष्टीवर टीका करणे, हे असंस्कृतीचे ओंगळवाणे प्रदर्शन आहे. आम्ही विकासाचे राजकारण करतो. नेत्यांवर टीका करून असंस्कृतीचे दर्शन घडवत नाही.
आमदार सुरेश खाडे : भाजपच्या नेतृत्वावर खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करणे, हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. पातळी ओलांडू नका अन्यथा तुमची जिल्ह्यात राजकीय कोंडी करू.
सम्राट महाडिक : महाराष्ट्र बचाव मोर्चा काढून राष्ट्रवादीने आपली संस्कृती दाखवली. भाजपा नेत्यांवर दमदाटी खपवून घेणार नाही. जयंत पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासात खीळ घालण्याचे काम केले आहे.
पृथ्वीराज पवार : जिल्ह्यात जातीयवाद, विकृती त्यांनीच जोपासली. संस्कृती बचावची भाषा करणाऱ्यांकडून एका विशिष्ट समाजावर खालच्या पातळीवर जाऊन टीका होते आहे. मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी यांच्यावर टीका होतेय. या लढाईत मी स्वतः आणि माझा भाऊ गौतम पवार आम्ही पडळकर यांच्याबरोबर आहोत.
घोटाळ्यांच्या पाठपुराव्यासाठी पाच जणांवर जबाबदारी
सांगली जिल्हा बँक, सर्वोदय साखर कारखाना, ऑनलाइन लाॅटरी, ठाणे येथील बिल्डर आत्महत्या प्रकरण, वाशी मार्केट घोटाळ्याच्या चौकशीचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी आमदार सदाभाऊ खोत, सम्राट महाडिक, आ. सत्यजित देशमुख यांच्यासह चंद्रकांत पाटील यांनी स्वत:कडे घेतली. जिल्हा बँकेच्या घोटाळ्यासाठी दर आठवड्याला मंत्रालयात पाहिजे, वेळ पडल्यास न्यायालयात जाऊ; पण जिल्हा बँकेची चौकशी होणारच, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.