सरकारी नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ११.५९ लाखांची फसवणूक; कोल्हापूर, पुण्याच्या तिघांविरुद्ध सांगलीत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 12:27 IST2026-03-09T12:26:52+5:302026-03-09T12:27:36+5:30
बनावट नियुक्तीपत्रे, तसेच रुजू अहवाल देखील दिला

संग्रहित छाया
सांगली : सार्वजनिक बांधकाम विभागातील नोकरीचे बनावट व खोटे नियुक्तीपत्र देऊन तरुणाची तब्बल ११ लाख ५९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्वप्नील उद्धव कांबळे (वय ३८, रा. शास्त्रीनगर, सांगली) यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
संशयित चंद्रकांत यादव महापुरे (रा. वारणा कोडोली, ता.पन्हाळा , जि. कोल्हापूर), राजाराम दत्तात्रय होळंबे (रा. अयोध्या कॉलनी, साई मंदिरानजीक, कोल्हापूर) आणि ज्ञानेश्वर चौधरी (रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी स्वप्नील कांबळे हा मजुरीचे काम करताे. त्याची संशयित तिघांशी ऑगस्ट २०२३ ओळख झाली होती. तेव्हा, त्यांनी शासकीय नोकरी निश्चितपणे लावतो, असे सांगून सप्टेंबर २०२४ अखेर कांबळे याच्याकडून ११ लाख ५९ हजार रुपये रोख व बँकेमार्फत उकळले. यानंतर त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्याकडील कनिष्ठ लिपिक पदासाठी सांगलीत नियुक्ती झाल्याचे कांबळे याला सांगितले. त्याचा विश्वास निर्माण होण्यासाठी बनावट नियुक्तीपत्रे, तसेच रुजू अहवाल देखील दिला.
मात्र, काही दिवसांतच कांबळे याने खात्री केल्यानंतर बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्याने संशयितांकडे पैसे परत मागितले. वारंवार पाठपुरावा करून त्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कांबळे याने तिघांविरुद्ध फिर्याद दिली.