Sangli Crime: हनी ट्रॅपप्रकरणी महिलेसह चार जण ताब्यात, कोल्हापूरच्या तरुणाची दोन लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:34 IST2025-11-22T19:32:28+5:302025-11-22T19:34:21+5:30
कोल्हापुरातील तरुणाना मारहाण करत जबरदस्तीने अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ काढले

Sangli Crime: हनी ट्रॅपप्रकरणी महिलेसह चार जण ताब्यात, कोल्हापूरच्या तरुणाची दोन लाखांची फसवणूक
मिरज (जि. सांगली) : सोशल मीडियाद्वारे मैत्रीचा बहाणा करून तरुणांना जाळ्यात ओढून लुटणाऱ्या हनी ट्रॅप टोळीला मिरज शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. कोल्हापुरातील तरुणास दोन लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिरजेत वखार भागात वास्तव्यास असलेली नुसरत शेख ही महिला फेसबुकवर तरुणांशी मैत्री करत भावनिक जाळ्यात ओढत होती. मैत्री झाल्यानंतर ब्लॅकमेल करून कोल्हापूर व कर्नाटकातील काही तरुणांचे लाखो रुपये लुटल्याच्या तक्रारी आहेत. कोल्हापूरचे अब्दुल हमीद दस्तगीर पाथरवट (वय ३८) यांना सोशल मीडियाद्वारे ओळख वाढवून नुसरत शेख हिने ६ सप्टेंबर रोजी मिरजेतील वखार परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये बोलावले.
पाथरवट फ्लॅटमध्ये पोहोचताच अचानक मोहसीन शेख, समीर कच्छी, रशिद सय्यद व जहाँआरा उर्फ झारा हे चौघे तेथे आले. त्यांनी तु हमारे बहन के साथ अकेले में क्या कर रहा है, असे ओरडत पाथरवट यांना पकडले. त्यांस पट्ट्याने मारहाण करत, जबरदस्तीने कपडे काढून अर्धनग्न अवस्थेतील फोटो व व्हिडीओ काढले. हे फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची व पोलिसांत तक्रार देण्याची धमकी देत चार जणांनी पाथरवट यांस दुपारी २:३० ते सायंकाळी ६:३० पर्यंत फ्लॅटमध्ये चार तास डांबून ठेवले.
यावेळी धमकी देऊन त्यांनी पाथरवट यांच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन, अर्धा तोळा सोन्याची अंगठी, गाडीच्या डिकीतील चांदीच्या बांगड्या, २२ हजार रुपये, असा १ लाख ९७ हजारांचा ऐवज लुटला. याप्रकरणी पाथरवट यांनी मिरज शहर पोलिसांत नुसरत शेख, मोहसीन शेख, समीर कच्छी, रशिद सय्यद आणि जहाँआरा उर्फ झारा (पूर्ण नाव माहीत नाही) या पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले आहे.