Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 13:14 IST2025-06-17T13:12:49+5:302025-06-17T13:14:09+5:30
जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले; दोन दिवसात प्रवेशाचे ठरले : काँग्रेसला मोठा धक्का

Sangli: वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्रीताई पाटील भाजपमध्ये, अजितदादांना शह
सांगली : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी सोमवारी भाजपचे नेते तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देत त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब केला. दोन दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत भाजप प्रवेश होणार आहे.
सोमवारी सकाळी पालकमंत्री पाटील, भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जनसुराज्यचे नेते समित कदम, भाजपचे शेखर इनामदार, सी. बी. पाटील, आदींनी जयश्रीताई पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी पक्ष प्रवेशाबाबत त्यांनी चर्चा केली. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला.
सांगलीच्या राजकारणात दिवंगत मदन पाटील यांचा स्वतंत्र गट कार्यरत आहे. काँग्रेसअंतर्गत आतापर्यंत हा गट सक्रिय होता. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिवंगत माजी मंत्री मदन पाटील गटाच्या नेत्या, जयश्रीताई पाटील यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली होती. यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. पाटील यांनी वेगळी राजकीय वाटचाल सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. यावेळी त्यांना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची ऑफर होती. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा निर्णय घेतला.
महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी मदनभाऊ गट भाजपबरोबर यावा, यासाठी प्रदेश पातळीवरील भाजपच्या नेत्यांनी जयश्रीताई पाटील यांना संपर्क केला होता. त्यांच्याशी चर्चेनंतर जयश्रीताई यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.
जयश्रीताई विचार करून निर्णय घ्या : अजित पवार यांचा निरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तुमच्या अडचणी सोडविण्याबरोबरच महापालिका क्षेत्रात पक्षाचे नेतृत्व देण्याचा शब्द दिला होता. अखेरच्या टप्प्यात चर्चा केल्याविना कोणताही निर्णय घाईने घेऊ नका, असाही निरोप रविवारी जयश्रीताई पाटील यांना अजित पवार यांनी दिला होता. अखेर भाजपची चाणक्य नीती कामी आली. जयश्रीताई यांनी भाजपमध्येच प्रवेश करावा, यासाठी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनीही निर्णायक भूमिका बजावली.
कार्यकर्त्यांचा सन्मान राखणार : चंद्रकांत पाटील
कार्यकर्त्यांचा सन्मान राखण्याबरोबरच या गटाला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा शब्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. जिल्हा नियोजन मंडळाच्या दोन जागा आणि वसंतदादा शेतकरी बँकेच्या चौकशीचा ससेमिरा थोपविण्याबरोबरच रिक्त असलेल्या सांगली, सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्याचा भाजप नेत्यांनी शब्द दिल्याची चर्चा आहे.
भाजपकडून अजितदादांना शह
जयश्रीताई पाटील यांनी आपल्या पक्षात यावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात चढाओढ सुरू होती. अखेर भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मनसुब्यांना एक प्रकारे शह देत महायुतीमध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचे दाखवून दिले.