Sangli Crime: उसाच्या वाड्यावरुन वाद, ढाणेवाडीत तरुण शेतकऱ्याचा मारहाणीत मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 18:43 IST2026-01-30T18:43:17+5:302026-01-30T18:43:38+5:30
शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले

Sangli Crime: उसाच्या वाड्यावरुन वाद, ढाणेवाडीत तरुण शेतकऱ्याचा मारहाणीत मृत्यू
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ढाणेवाडी येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या घटनेने संपूर्ण गावात मोठी खळबळ उडाली आहे. उसाच्या वाड्याच्या किरकोळ वादानंतर झालेल्या मारहाणीनंतर एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला असून, हा मृत्यू मारहाणीमुळे झाला की अन्य कोणत्या कारणांनी, याबाबत अद्याप कोणताही अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. याबाबत पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया व तपास सुरू होता. विनायक प्रभाकर ढाणे (वय ३५, रा. ढाणेवाडी, ता. कडेगाव) असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. २९ ) रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ढाणेवाडी येथे विनायक यांच्या चुलत्याच्या उसाच्या शेतात काही तरुणांशी उसाचे वाडे देण्यावरून विनायक यांचा वाद झाला होता. या वादानंतर संबंधित तरुणांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगण्यात येते. मारहाणीनंतर विनायक ढाणे यांची प्रकृती अचानक खालावली. ग्रामस्थ व नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी कडेगाव येथील रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मारहाणीचा शरीरावर झालेला परिणाम कारणीभूत ठरला की, अन्य कोणते कारण याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर ढाणेवाडी गावात तीव्र अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित तरुणांवर खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत असून, न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
पोलिस ठाण्यासमोर ग्रामस्थांचा ठिय्या
ढाणेवाडी ग्रामस्थांनी आरोपींना अटक करण्याच्या व खुनाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कडेगाव पोलिस ठाण्यासमोर रात्री उशिरापर्यंत ठिय्या मारला होता.