Sangli Accident News: कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठिमागून जोराची धडक, कोल्हापुरातील दाम्पत्य जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:31 IST2026-03-24T12:30:00+5:302026-03-24T12:31:07+5:30
ट्रॅक्टर चालक पसार

Sangli Accident News: कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला पाठिमागून जोराची धडक, कोल्हापुरातील दाम्पत्य जागीच ठार
कवठेमहांकाळ : मिरज–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) येथे आज, मंगळवारी (दि. २४) सकाळी भीषण अपघात झाला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला कारची पाठिमागून जोराची धडक बसली. या अपघातातकोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
संतोष गायकवाड व ॲड. वंदना गायकवाड (वय ४३) अशी मृतांची नावे आहेत. ते कोल्हापूरहून पंढरपूरकडे जात असताना हा अपघात झाला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.
महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास शिरढोण गावाच्या हद्दीत महादेव रेस्टॉरंटसमोर हा अपघात घडला. संतोष गायकवाड हे पत्नीसोबत कारने (एमएच ०९ एफ.जे २८१५) मिरजकडून पंढरपूरकडे जात होते. दरम्यान, रस्त्याकडेला उभी असलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉली ट्रॅक्टर क्र. (एमएच ०९ सीजे २६७१), ट्रॉली क्र. (एमएच १३ टी ०९३९) ला त्यांच्या कारची पाठिमागून जोराची धडक बसली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भागाचा चकाचुरा झाला होता. यात संतोष गायकवाड व ॲड. वंदना गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रॅक्टर चालक पसार
अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अनिल सावळे, उपनिरीक्षक अरुण पाटील, पोलीस कर्मचारी महेश पौटे व श्रीकांत चालक थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ पंचनामा करून मदतकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांनीही बचावकार्याला हातभार लावला. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
काही काळवाहतूक विस्कळीत
अपघातग्रस्त दोन्ही वाहने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या क्रेनच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला हलविण्यात आली. काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.