वाळवा पंचायत समितीच्या सभेत टीव्ही खरेदीवरून पुन्हा वादंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:28 IST2021-09-25T04:28:21+5:302021-09-25T04:28:21+5:30

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना १५ व्या वित्त आयोगातून दिलेल्या ८८ टीव्ही संच खरेदीत घोटाळा झाल्याचा ...

Controversy again over TV purchase at Valva Panchayat Samiti meeting | वाळवा पंचायत समितीच्या सभेत टीव्ही खरेदीवरून पुन्हा वादंग

वाळवा पंचायत समितीच्या सभेत टीव्ही खरेदीवरून पुन्हा वादंग

इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना १५ व्या वित्त आयोगातून दिलेल्या ८८ टीव्ही संच खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप आशिष काळे यांनी केला. त्यांच्या या आरोपामुळे सभागृहामध्ये वादंग माजले होते. उपसभापती नेताजीराव पाटील यांनी तालुक्याची आणि सभागृहाची बदनामी करू नका, असे बजावत खरेदीची सर्व प्रक्रिया नियमानुसार झाल्याचे स्पष्ट केले.

पंचायत समिती सभागृहात सभापती शुभांगी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती नेताजीराव पाटील, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मासिक सभा झाली. या सभेत पाणीपुरवठा, बांधकाम विभागाकडील कामे गतीने पूर्ण करण्याची मागणी सदस्यांनी केली.

आशिष काळे यांनी आज सभागृहात टीव्ही खरेदी घोटाळ्याबाबत आवाज उठवताना पंचायत समितीने ज्या दराने हे टीव्ही संच खरेदी केले. त्याच कंपनीच्या टीव्हीचे त्यापेक्षा कमी दराचे कोटेशन सादर करून खळबळ उडवून दिली. काळे यांनी १७ हजार ४५० रुपयांचे कोटेशन सभागृहात सादर केले. प्रशासनाने या ८८ टीव्ही संचांची प्रत्येकी २८ हजार ८०० रुपयांना खरेदी केली आहे. त्यामुळे या टीव्ही खरेदी घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी काळे यांनी लावून धरली.

या आरोपामुळे सभागृहात गदारोळ माजला होता. कॉँग्रेसच्या आनंदराव पाटील यांनी सदस्यांना त्यांना हवी असलेली माहिती प्रशासनाने पुरविली पाहिजे, अशी मागणी केली. दरम्यान, उपसभापती नेताजीराव पाटील यांनी टीव्ही खरेदीची ही सर्व प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या अधिकृत कंपनीकडून कायदेशीरपणे करण्यात आल्याचे सांगत या प्रकरणात तालुक्याची आणि सभागृहाची बदनामी करू नका, असे काळे यांना बजावले.

चौकट

गटविकास अधिकाऱ्यांचे मौन...

पंचायत समितीच्या सभेत आशिष काळे यांनी कागदपत्रांसह टीव्ही खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी केल्यावर सभागृहातील वातावरण तापले होते. नवे गटविकास अधिकारी आबासाहेब पवार यांनी या चर्चेत कोणताही हस्तक्षेप न करता मौन बाळगणे पसंत केले होते.

Web Title: Controversy again over TV purchase at Valva Panchayat Samiti meeting