सरकारच्या फसवणुकीमुळेच हर्षल पाटील यांची आत्महत्या - शशिकांत शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 19:38 IST2025-07-30T19:37:12+5:302025-07-30T19:38:31+5:30
सरकार आर्थिक संकटात, तांदूळवाडीत पाटील कुटुंबीयांची भेट

सरकारच्या फसवणुकीमुळेच हर्षल पाटील यांची आत्महत्या - शशिकांत शिंदे
सांगली : आमचा तो कंत्राटदारच नाही, असे सांगून सरकारने हात झटकले. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणाने, बिले न देण्याच्या भूमिकेने कंत्राटदार हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली. याला सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे, असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह शिंदे यांनी सोमवारी तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील हर्षल पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्यानंतर आजतागायत जिल्ह्यातील एकही शासकीय अधिकारी पाटील कुटुंबीयांच्या घरी फिरकला नाही. यावरून या सरकारची किती बेफिकिरी सुरू आहे, हे स्पष्ट होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरूच आहेत.
आता कंत्राटदार आत्महत्या करीत आहेत. सरकारने वेळेत कामाची बिले दिली असती तर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येची घटना घडलीच नसती. पाटील यांच्या कुटुंबाला आधार देणे, मदत देण्याची भूमिका सरकारची असायला हवी होती. मात्र, त्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले. या घटनेला सर्वस्वी सरकार व त्यांच्या संबंधित खात्याचे मंत्रीच जबाबदार आहेत.
कंत्राटदारांना सतर्क केले होते : जयंत पाटील
सरकारने सर्व फसव्या योजना जाहीर केल्या होत्या. त्यामुळे त्याचे परिणाम सर्व घटकांवर होणार होते. कंत्राटदारांना जेवढी बिले मिळतील तेवढीच कामे करण्याबाबत सतर्क केले होते. मात्र, अनेक कंत्राटदारांनी मोठ्या प्रमाणावर कामे घेतली. सरकारने बिले न देता त्यांची फसवणूक केली, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
सरकार आर्थिक संकटात
जयंत पाटील म्हणाले की, राज्यात पाच लाख कंत्राटदारांची बिले थकीत आहेत. सरकारने अनेक भूलथापा दिल्या, फसव्या घोषणा केल्या. अनेक कामांची उद्घाटने केली. आर्थिक अडचणीमुळे आता सरकार पैसे देत नाही. या सर्वांचा परिणाम शेतकरी, कंत्राटदार, उद्योजक यांच्यावर होत आहे. हर्षल पाटील हे उपकंत्राटदार होते. त्यांनी ज्या सरकारी कंत्राटदाराकडून काम घेतले त्यालाही सरकारने दाद दिली नाही.