Sangli: ईश्वरपुरात महायुतीच्या उमेदवारांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार, कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 18:18 IST2025-11-27T18:16:56+5:302025-11-27T18:18:23+5:30
Local Body Election: प्रभागाची निवडणूक रद्द करावी, तसेच महायुतीच्या उमेदवारांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली

Sangli: ईश्वरपुरात महायुतीच्या उमेदवारांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार, कारवाईची मागणी
ईश्वरपूर : उरूण ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रं.३ मध्ये वादाची पहिली ठिणगी पडली. या प्रभागातून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शकील सय्यद व शिंदे सेनेच्या गीता सोनार या उमेदवार आहेत. बुधवारी सकाळी प्रचार करणाऱ्या शकील सय्यद यांच्यासह त्यांच्या चार समर्थकांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव व त्यांच्या साथीदारांनी जातीवाचक शिवीगाळ करत हातपाय तोडून जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवर दोन्ही उमेदवारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
महायुतीच्या नेत्यांनी पोलिस आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन महायुतीच्या उमेदवारांना प्रचारास मज्जाव करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ शकील सय्यद व गीता सोनार यांनी संविधान दिनादिवशीच डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.
तक्रारीनुसार सय्यद आणि त्यांच्या सहकारी उमेदवार सोनार या प्रचार करत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार खंडेराव जाधव यांचे पुतणे सागर जाधव यांनी ८ ते १० साथीदारांच्या मदतीने अडवणूक करून सय्यद यांच्या हातातील महायुतीची प्रचार पत्रके हिसकावून घेत फेकून दिली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. महिला उमेदवारासही हातपाय मोडण्याची दमदाटी केली, असे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे या प्रभागाची निवडणूक रद्द करावी, तसेच महायुतीच्या उमेदवारांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.