कुपवाडमध्ये कोम्बिंग आॅपरेशन

By Admin | Updated: November 22, 2015 00:04 IST2015-11-21T23:53:31+5:302015-11-22T00:04:55+5:30

चौघांना अटक : तलवार, कोयत्यासह धारधार शस्त्रे जप्त

Combing Operation in Kupwara | कुपवाडमध्ये कोम्बिंग आॅपरेशन

कुपवाडमध्ये कोम्बिंग आॅपरेशन

कुपवाड : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पोलिसांकडून कुपवाड शहरासह उपनगरांमधून शुक्रवारी मधरात्री कोम्बिंग आॅपरेशनची मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नऊ धारधार शस्त्रे सापडली असून, चार गुन्हेगारांवर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी धीरज पाटील, पोलीस निरीक्षक अशोक भवड यांच्या नेतृत्वाखालील पस्तीस पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगर, रामकृष्णनगर, बामणोली, आंबा चौक, दुर्गानगर आदी भागात ही मोहीम राबवली.
अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये सुभाष शांताराम चिंचकर, दिग्विजय सुभाष चिंचकर, दिनेश सुभाष चिंचकर यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे लोखंडी कोयता, तलवार, सुरा आदी हत्यारे सापडली. राहुल सुभाष माने या गुंडाच्या घरावरही पोलिसांनी छापा टाकला. त्यात दोन कोयते, दोन सत्तूर आणि सुरा सापडला. त्याच्याकडील हत्यारेही पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहेत.
सर्वांना अवैधरित्या धारधार हत्यारे बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. हवालदार नितीन कुरणे व रमेश जाधव तपास करीत आहेत. (वार्ताहर)
तडीपार प्रस्तावाची यादी तयार
शहरातील फाळकूट दादांबरोबरच राजकीय वरदहस्त असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. या गुन्हेगारांच्या कारवायांवर पोलिसांकडून वॉच ठेवण्यात येत आहे. त्यातील काहींचा तडीपारीचा प्रस्तावही तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Combing Operation in Kupwara