मिरजेतील उद्योजक सी.आर. सांगलीकर यांना अटक, पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई; नेमकं प्रकरण काय.. वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:42 IST2026-01-01T13:41:00+5:302026-01-01T13:42:08+5:30
अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

मिरजेतील उद्योजक सी.आर. सांगलीकर यांना अटक, पिंपरी-चिंचवड आर्थिक गुन्हे शाखेकडून कारवाई; नेमकं प्रकरण काय.. वाचा
मिरज (जि. सांगली) : मिरजेतील उद्योजक व राजकीय कार्यकर्ते ॲड. चंद्रकांत रामचंद्र ऊर्फ सी.आर. सांगलीकर यांना पिंपरी-चिंचवड येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिरजेतून अटक केली. बावधन पोलिसांत त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या २७ कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी ही अटकेची कारवाई मंगळवारी करण्यात आली.
पांडुरंग पवार यांनी १८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या तक्रारीवरून ॲड. सांगलीकर व इतर चार जणांविरोधात बावधन पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. पीएसीएल कंपनीची व सर्वोच्च न्यायालय नियुक्त लोढा समितीच्या ताब्यातील मौजे सुस, ता. मुळशी, जि. पुणे येथील तब्बल २७ कोटी ९१ लाख ९० हजार रुपयांची ३३ एकर जमीन बेकायदा विक्री करून पीएसीएलमधील गुंतवणूकदार व शासनाची फसवणूक केल्याचा आरोप सांगलीकर व त्यांच्या चार साथीदारांवर आहे.
ॲड. सांगलीकर सध्या मिरज परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मिरजेत छापा टाकून त्यांना अटक केली. सांगलीकर यांना न्यायालयाने दि.५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.
अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
ॲड. सी.आर. सांगलीकर यांनी २०१४ मध्ये मिरज विधानसभा निवडणूक लढविली होती. गत निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर टीका केल्याने ते चर्चेत आले होते. सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.