महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर भाजपने खालच्या पातळीवर नेला, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 13:28 IST2025-09-23T13:27:38+5:302025-09-23T13:28:17+5:30

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळावरच राज्यभर वाचाळवीर फोफावले, सांगलीत महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा

BJP has brought the level of politics in Maharashtra to a lower level, criticism from Mahavikas Aghadi leaders | महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर भाजपने खालच्या पातळीवर नेला, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र 

महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर भाजपने खालच्या पातळीवर नेला, महाविकास आघाडीच्या नेत्यांचे टीकास्त्र 

सांगली : भाजपच्याच काळात राजकारणाचा स्तर घसरला असून त्यांनी पोसलेल्या वाचाळवीरांनी वातावरण दूषित केले आहे. भाजपने महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला नीचतम पातळीवर नेऊन ठेवले, अशी टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी सोमवारी सांगलीत केली.

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ सांगलीत सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुढाकाराने महाराष्ट्र संस्कृती बचाव मोर्चा काढण्यात आला. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. यामध्ये राज्यभरातील नेते व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले.

मोर्चा राम मंदिर चौक, पंचमुखी मारुती रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बालाजी चौकमार्गे जुन्या स्टेशन चौकात आला. याठिकाणी निषेध सभा झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील पाटील, अमोल कोल्हे, विशाल पाटील, आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, डॉ. विश्वजित कदम, अरुण लाड, नीलेश लंके, माजी आमदार राजू आवळे, मिलिंद कांबळे, मानसिंगराव नाईक, माजी मंत्री राजेश टोपे, सक्षणा सलगर, उद्धवसेनेचे रणजित बागल, प्रा. यशवंत गोसावी आदी यावेळी उपस्थित होते.

शशिकांत शिंदे म्हणाले, एकदा पोलिसांकडून सूट द्या, राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता सडेतोड उत्तर देईल. भाजपने महाराष्ट्राची संस्कृती बिघडवली. अनेक नेते फोडले, पण जयंत पाटील ठाम राहिल्यानेच भाजपने त्यांच्यामागे षडयंत्र लावले. अशी भाषा पुन्हा निघाली, तर संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी असेल. एकाच्या बोलण्याने संपूर्ण महाराष्ट्र सरकारची निंदा करीत आहे.

रोहित पवार म्हणाले, हा संपूर्ण महाराष्ट्राचा हा लढा आहे. आम्हीही काहीवेळा आक्रमक बोलतो, पण मूळ विचार सोडत नाही. काही लोक स्वतःला चाणक्य समजतात. तुम्ही जाहिरात देऊन नटसम्राट होऊ शकता, पण लोकनेता होणार नाही. राज्यात गलिच्छ राजकारण या सरकारने आणले. भाजपच्या काळात महामानवांबद्दल वाट्टेल ते बोलले जात आहे.

यावेळी अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड, नीलेश लंके, राजेश टोपेे, खासदार विशाल पाटील, विश्वजित कदम, आमदार उत्तम जानकर, युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष मेहबूब शेख, सक्षणा सलगर, दिलीप पाटील आदींची भाषणे झाली.

जयंत पाटील यांचे नाव येईल, म्हणून गप्प

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील म्हणाले, पडळकर यांना धडा शिकविण्यास वेळ लागणार नाही. आमच्या पद्धतीने आम्ही त्यांचा बंदोबस्त केला तर जयंत पाटील यांचे नाव त्यात गोवले जाईल म्हणून आम्ही गप्प आहोत. तरीही यापुढे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्याविषयी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले तर आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ.

लोकशाहीसाठी धोक्याची घंटा

माजी मंत्री राजेश टोपे म्हणाले की, वाचाळवीरांची संख्या वाढल्याने राजकारणाची बदनामी होत आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुण वर्ग राजकारणात येण्यास इच्छुक दिसत नाहीत. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे.

Web Title: BJP has brought the level of politics in Maharashtra to a lower level, criticism from Mahavikas Aghadi leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.