Sangli: लॉकर फोडणाऱ्या टोळीला बँकेची खडान् खडा माहिती, कोट्यवधींचा मुद्देमाल लंपास; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 14:09 IST2026-01-10T14:07:27+5:302026-01-10T14:09:09+5:30
लॉकर व स्ट्राँग रूमला प्लायवूडचे दरवाजे : सुरक्षारक्षकांचा अभाव

Sangli: लॉकर फोडणाऱ्या टोळीला बँकेची खडान् खडा माहिती, कोट्यवधींचा मुद्देमाल लंपास; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आटपाडी : आटपाडी तालुक्यातील झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी घातलेला दरोडा केवळ चोरीपुरता मर्यादित न राहता बँकेच्या एकूणच सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा उघड करणारा ठरला आहे. ग्राहकांचे लॉकर फोडून सुमारे कोट्यवधींच्या सोन्या-चांदीचा मुद्देमाल लंपास झाल्याची तक्रार बँकेच्या अधिकाऱ्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
विशेष म्हणजे झरे येथील बँकेत यापूर्वीही चोरीच्या प्रयत्नाचा अनुभव घेतलेली असताना, आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे कुठेही दिसून येत नाही. बँकेच्या पाठीमागील बाजूस थेट खिडकी असणे, ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असतानाही ती खिडकी आजतागायत कायम कशी ठेवण्यात आली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
बँकेची स्ट्राँग रूम आणि लॉकर रूम ही सिमेंट काँक्रीटने बांधलेली असणे आणि त्यांचे दरवाजे अतिशय मजबूत, लोखंडी व सुरक्षित असणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात झरे शाखेतील स्ट्राँग रूम व लॉकर रूमचे दरवाजे साध्या प्लायवूडचे असल्याचे चित्र समोर आले आहे.
या शाखेत नामवंत कंपनीचे दोन लॉकर असून, त्यापैकी एका लॉकरला गॅस कटरने कापण्यात आल्याची नोंद फिर्यादीत आहे. यामुळे ‘ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू खरोखर सुरक्षित होत्या का?’ हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.
सोळा शाखा, पण सुरक्षारक्षक फक्त दोन ठिकाणी
आटपाडी तालुक्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण सोळा शाखा आहेत. यापैकी केवळ आटपाडी शहर व आटपाडी मार्केट यार्ड या दोनच शाखा स्वतःच्या जागेत, स्वतःच्या इमारतीत असून, त्याठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. उर्वरित सर्व शाखा भाड्याच्या इमारतींमध्ये चालवल्या जात असून, एकाही शाखेत सुरक्षारक्षक नाही, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
मनुष्यबळाचाही अभाव
झरे शाखेत एकूण फक्त तीन कर्मचारी कार्यरत आहेत. शाखाधिकारी हेच कॅशिअरचे काम पाहतात, एक लिपिक आणि एक शिपाई एवढाच संपूर्ण कारभार. एवढ्या तोकड्या मनुष्यबळावर ग्राहकांच्या कोट्यवधींच्या ठेवी व मौल्यवान वस्तूंची जबाबदारी टाकणे म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखेच असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
आरबीआयचा नियम काय ?
लॉकरमधील मुद्देमालावर कोणताही थेट विमा नसल्याचे आरबीआयच्या नियमांमध्ये स्पष्ट आहे. मात्र, बँकेत चोरी होऊन लॉकर फोडले गेले आणि मुद्देमाल सापडला नाही, तर संबंधित लॉकरधारकास लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या शंभरपट रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळू शकते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लॉकरचे वार्षिक भाडे साधारणतः ८०० ते २,००० रुपये, तर डिपॉझिट १० ते २५ हजार रुपये इतके आहे. म्हणजेच कोट्यवधींच्या नुकसानीपुढे ही भरपाई अत्यंत तोकडी ठरणार आहे.
ग्राहकांच्या वेदना : ‘आमचे कष्ट कुणाकडे सुरक्षित?’
याबाबत लॉकरधारक वर्षा पुकळे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, त्यांनी व्यथित शब्दांत भावना व्यक्त केल्या. “मी, माझी आई आणि वहिनी यांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून घेतलेले दागिने सुरक्षित राहावेत म्हणून बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. बँकेवर विश्वास ठेवून आम्ही तेथे दागिने ठेवले, मग आमचे सोने अशा सहजपणे कसे नेले गेले? लॉकर सुरक्षित नव्हते तर मग आमचे दागिने का ठेवून घेतले?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
बँक प्रशासनाची भूमिका
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आटपाडी तालुका विभागीय अधिकारी हरुण जमादार यांनी सांगितले की, झरे शाखेचे शाखाधिकारी हणमंत गळवे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तपास सुरू असून, पुढील कारवाई पोलिसांकडून केली जात आहे. ग्राहकांनी विश्वासाने बँकेत ठेवलेली आयुष्यभराची पुंजी सुरक्षित नसेल, तर सामान्य नागरिकांनी नेमका विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न आता आटपाडी तालुक्यातील प्रत्येक बँक खातेदार विचारू लागला आहे.