संजय कांबळेनंतर पोलिसांच्या ‘वॉन्टेड’ यादीत म्हमद्या नदाफ

By Admin | Updated: November 23, 2015 00:30 IST2015-11-22T22:55:03+5:302015-11-23T00:30:29+5:30

पोलिसांची दुसरी डोकेदुखी : पहिली मोहीम अयशस्वीच

After the Sanjay Kamble, Nadaf was named in the 'Wanted' list of the police | संजय कांबळेनंतर पोलिसांच्या ‘वॉन्टेड’ यादीत म्हमद्या नदाफ

संजय कांबळेनंतर पोलिसांच्या ‘वॉन्टेड’ यादीत म्हमद्या नदाफ

सांगली : विट्यातील यशवंतनगरमध्ये राहणाऱ्या कुख्यात गुंड संजय कांबळे याच्यानंतर गेल्या अकरा वर्षात प्रथमच गुंड म्हमद्या नदाफ पोलिसांच्या ‘वॉन्टेड’ यादीत आला आहे. कांबळे तब्बल आठ वर्षे फरारी राहिला. पण अखेर विट्यातच त्याचा खून झाल्याचे उघडकीस आले होते. म्हमद्या नदाफचा शोध सुरु आहे. कायद्यानुसार पोलिसांनी त्यालाही ‘वॉन्टेड’ घोषित करुन त्याच्या मालमत्तेवर ‘टाच’ आणण्याची प्रक्रिया सुरु ठेवली आहे.
खंडणीच्या गुन्ह्यातील साक्षीदार गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याचा खून करुन रातोरात गायब झाला आहे. दीडशेहून अधिक पोलिसांचा फौजफाटा त्याचा शोध घेत आहे. मात्र त्याचे काहीच धागेदोरे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे गेल्या आठवड्यात पोलिसांनी त्याला ‘वॉन्टेड’ घोषित करुन त्याचे पोस्टरही बनविले. हे पोस्टर सांगलीतील संजयनगरसह विविध उपनगर तसेच आजू-बाजूच्या जिल्ह्यातही लावली आहे. या पोस्टरमुळे गुंड संजय कांबळेविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईला उजाळा मिळाला आहे. खून, दरोडे असे बत्तीसहून अधिक
गुन्हे दाखल असलेल्या संजय कांबळे याच्या कारनाम्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली होती. त्याच्या साथीदारांना अटक केली होती. परंतु कांबळे सापडला नव्हता. त्याला पोलिसांनी ‘वॉन्टेड’ घोषित करुन पोस्टर प्रसिद्ध केले होते. फरारी असतानाच त्याचा विट्यात खून झाल्याचे उघडकीस आले होते. (प्रतिनिधी)

म्हमद्या सापडणार का?
गेल्या बारा ते तेरा वर्षांत सांगली पोलिसांना गुंड संजय कांबळे व म्हमद्या नदाफ हे डोईजड झाल्याचे स्पष्ट होत आहे. संजय कांबळेची शोधमोहीम शेवटपर्यंत अयशस्वीच ठरली. शेवटी त्याचा खून झाला. आता म्हमद्या नदाफची पोलिसांनी सुरू केलेली शोधमोहीम यशस्वी होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: After the Sanjay Kamble, Nadaf was named in the 'Wanted' list of the police