Sangli: वीस लाखांच्या हुंड्यापोटी लग्न मोडले, तरुणीने कीटकनाशक प्राशन केले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:01 IST2025-12-24T13:59:57+5:302025-12-24T14:01:45+5:30
चार दिवसांवर आले होते लग्न. मिरजेतील पदवीधर तरुणीचा पुण्यात अभियंता असलेल्या तरुणासोबत सहा महिन्यांपूर्वी विवाह ठरला होता.

Sangli: वीस लाखांच्या हुंड्यापोटी लग्न मोडले, तरुणीने कीटकनाशक प्राशन केले
मिरज (जि.सांगली) : लग्न चार दिवसांवर आले असताना, उच्चशिक्षित वराने २० लाख रुपये आणि दहा तोळे सोन्याची मागणी केल्याने लग्न मोडल्याची घटना घडली. यानंतर, तरुणीने मिरजेत कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित तरुणीवर मिरज सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे.
मिरजेतील बी. फार्मसी पदवीधर तरुणीचा पुण्यात अभियंता असलेल्या तरुणासोबत सहा महिन्यांपूर्वी विवाह ठरला होता. दोघांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. साखरपुड्यानंतर भावी पतीने तरुणीस नोकरी सोडण्यास भाग पाडले. वराकडील मंडळींनी मानपान आणि इतर कारणांसाठी वेळोवेळी सुमारे सहा लाख रुपये घेतल्याची तक्रार तरुणीच्या कुटुंबीयांनी केली आहे. विवाह दि. २८ रोजी होणार होता.
मात्र, त्यापूर्वी वराकडून २० लाख रुपये रोख व दहा तोळे सोन्याची मागणी करण्यात आली. ही रक्कम देणे शक्य नसल्याने तरुणीच्या वडिलांनी विवाहास नकार दिला आणि साखरपुड्यासाठी व मानपानासाठी दिलेले सुमारे सहा लाख रुपये परत देण्याची मागणी केली, परंतु वराने ही रक्कम परत देण्यास नकार दिला, त्यामुळे प्रकरण गांधी चौक पोलिस ठाण्यात येथे पोहोचले.
दरम्यान, लग्न मोडल्याने मानसिक तणावात असलेल्या तरुणीने ‘माझ्या आत्महत्येस होणारा पती आणि त्याचे पालक जबाबदार’ असल्याची चिठ्ठी लिहून मामाच्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.