गणेशोत्सवाच्या महाप्रसादावेळी वाद, सांगलीतील माधवनगरमध्ये तरुणावर खुनी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:53 IST2025-09-03T16:53:01+5:302025-09-03T16:53:22+5:30
संशयितांविरोधात गुन्हे दाखल

गणेशोत्सवाच्या महाप्रसादावेळी वाद, सांगलीतील माधवनगरमध्ये तरुणावर खुनी हल्ला
सांगली : माधवनगर येथे गणेशोत्सवात महाप्रसादावेळी प्लेट घेण्याच्या कारणावरून हाणामारी झाली. वादाचा राग मनात धरून दोघांनी एका तरुणावर चाकूने खुनी हल्ला केला. माधनवनगरमध्ये कर्नाळ रस्त्यावरील शिवतेज कॉलनीत रविवारी (दि. ३१) रात्री ९ वाजता हा प्रकार घडला.
चाकू हल्ल्यात हर्ष सुरेश खाडे (वय २३, रा. शिवतेज कॉलनी, गुलाब आलदर यांच्या घरात भाड्याने, माधवनगर - कर्नाळ रस्ता, सांगली) हा तरुण जखमी झाला. त्याचे वडील सुरेश गणपती खाडे यांनी संजयनगर पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दस्तगीर गडकरी आणि अमीर गडकरी (रा. शिवतेज कॉलनी, माधवनगर - कर्नाळ रस्ता, सांगली) यांच्याविरोधात गुन्हे नोंदविले.
दोन दिवसांपूर्वी (शुक्रवारी, दि. २९ रोजी) माधवनगरमध्ये शनिवार पेठेतील भगत गल्लीत एका गणेशोत्सव मंडळाचा महाप्रसाद होता. त्यावेळी हर्ष खाडे आणि संशयितांमध्ये वाद झाला होता. गणपती मंडळाने आयोजित केलेल्या महाप्रसादात प्लेट घेण्याच्या कारणावरून किरकोळ भांडण पेटले होते. याचा राग संशयितांच्या मनात होता.
त्यांनी रविवारी रात्री हर्ष याच्या घरासमोर येऊन त्याच्याशी वाद घातला. हर्षच्या मानेवर, गालावर चाकूने वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता ११८(२), ३५२, ३५१(२), ३(५) नुसार संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले.