Sangli Accident: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात; जवानाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 19:24 IST2025-11-24T19:22:41+5:302025-11-24T19:24:37+5:30
खड्डा चुकावताना दोन दुचाकींची झाली समोरासमोर धडक

Sangli Accident: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात; जवानाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
मिरज : पाटगाव (ता. मिरज) येथे रस्त्यावरील खड्डा चुकावताना दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत सुटीवर घरी आलेल्या लष्करी जवानाचा मृत्यू झाला. अक्षय ऊर्फ नितीन अशोक नरुटे (वय २९, रा. सोनी), असे मृत जवानाचे नाव आहे. कश्मीरमधील श्रीनगर येथे ते भारतीय लष्करात सेवेत होते.
अक्षय नरुटे त्यांच्या लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त ते काही दिवसांसाठी गावी आले होते. शनिवारी कामानिमित्त मिरज शहरात जाऊन परत येत असताना पाटगाव येथील पाटील मळा परिसरात रस्त्यावरील खोल खड्डा चुकवताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्याचक्षणी समोरून येणाऱ्या दुचाकीची त्यांच्या वाहनाला जोरदार धडक बसली. अपघातात नितीन नरुटे यांचा जागीच मृत्यू झाला.
दुसऱ्या दुचाकीवरील अमोल लक्ष्मण माने व धनंजय सुरेश पाटील हे गंभीर जखमी असून, त्यांना मिरजेत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाटील मळा परिसरात रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्याने, खड्ड्यांमुळेच हा अपघात झाल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. या प्रकरणाचा तपास मिरज ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे.