Sangli Crime: ईश्वरपुरातील एका कुटुंबास ९२ लाखांचा गंडा, आजरा तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:38 IST2025-11-19T18:33:33+5:302025-11-19T18:38:48+5:30
बनावट सह्या करून रक्कम उकळली

Sangli Crime: ईश्वरपुरातील एका कुटुंबास ९२ लाखांचा गंडा, आजरा तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल
ईश्वरपूर : ईश्वरपूर येथील मंत्री कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबाचा विश्वास संपादन करत, त्यांनी बँक आणि पतसंस्थेत ठेव पावती करण्यासाठी वेळावेळी दिलेल्या ९२ लाखांच्या रकमेवर आजरा तालुक्यातील ठकसेनाने डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार २०२० ते मार्च २०२५ या कालावधीत घडला आहे.
याबाबत डॉ.राणोजी अशोकराव शिंदे (वय ५०) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सचिन विष्णू पाटकर (रा.वझरे, ता.आजरा, जि.कोल्हापूर) याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांखाली फसवणूक, विश्वासघात, ठकबाजीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सचिन पाटकर याने डॉ.राणोजी शिंदे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आई, वडील व इतर सदस्यांचा विश्वास संपादन केला होता.
त्यामुळे कुटुंबातील सर्वजण त्याच्याकरवी बँक आणि पतसंस्थेमधील आर्थिक व्यवहार करत होते. त्यांच्या या विश्वासाचा गैरफायदा घेत, पाटकर याने ५ वर्षांच्या काळात तब्बल ९२ लाख १५ हजार ७६५ रुपये इतकी रक्कम त्यांना परत न करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरली. पोलिस उपनिरीक्षक सतीश मिसाळ अधिक तपास करीत आहेत.
बनावट सह्या करून रक्कम उकळली
पाटकर याने या शिंदे कुटुंबाच्या परस्पर बँकेत जाऊन शिंदे यांच्या आई-वडिलांच्या नावाने असलेल्या ठेवींची मुदत पूर्ण झाल्यावर तर काही पावत्यांची मुदत संपण्यापूर्वी रक्कम मिळण्यासाठी दोघांच्या नावाने पैसे काढण्याच्या स्लिपवर बनावट सह्या करून ही रक्कम उकळली आहे, तसेच त्याने बँकेत रक्कम जमा केली आहे, हे भासविण्यासाठी बँकेच्या नावाने हुबेहूब दिसणाऱ्या बनावट पावत्या तयार करून त्या खऱ्या आहेत असे सांगत, या कुटुंबांची फसवणूक केली.