Sangli Crime: ‘हिट ॲन्ड रन’प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल, अपघातात १२ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:47 IST2025-11-25T13:47:10+5:302025-11-25T13:47:10+5:30
दारूच्या नशेत मोटार बेदरकारपणे चालवत रस्त्यावर जाणाऱ्या सहा वाहनांना धडक दिली होती

Sangli Crime: ‘हिट ॲन्ड रन’प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल, अपघातात १२ जण जखमी
सांगली : शहरातील बालाजी मिल रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत मोटार चालवून ११ जणांना ठोकरून जखमी केल्याप्रकरणी मोटार चालक संतोष मदनगोपाल झंवर (वय ५२, रा. दक्षिण शिवाजीनगर सांगली) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी अवधूत तुकाराम सुतार (वय ३९, रा. एसटी स्टॅण्ड रोड, गावभाग) यांनी फिर्याद दिली आहे.
दारूच्या नशेत असलेल्या चालक संतोष झंवर याने त्याच्या मालकीची मोटार बेदरकारपणे चालवत रस्त्यावर जाणाऱ्या सहा वाहनांना रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास धडक दिली. या धडकेत सहाही वाहनांचे मोठे नुकसान झाले. तसेच या अपघातात त्याच्यासह एकूण १२ जण जखमी झाले आहेत.
जखमींमध्ये अविनाश बाळासाहेब माने (वय ४५), आयुष अविनाश माने (९), अन्वी अविनाश माने, आरती अविनाश माने (सर्व रा. संजयनगर), पाडाण्णा हणमंत मद्रासी, अनिता चंदू पोकरे (४०, रा. कर्नाळ रस्ता, सांगली), नीलेश जितलाल मिस्त्री (४२), रेणुका नीलेश मिस्त्री (३९, रा. अहिल्यानगर, सांगली), स्वाती विश्वकर्मा (रा. अहिल्यानगर), सिद्धी राजेश पिराळे (१२), राजेश सुभाष पिराळे (रा. गणेशनगर, सांगली) यांचा समावेश आहे.
चालक संतोष झंवर याने दारूच्या नशेत वेगात मोटार चालवून एका मोटारीसह चार मोपेडला धडक दिली. त्यानंतर पळून जाताना संतप्त जमावाने त्याला पकडले. धडकेत झंवर याच्या मोटरीची एअर बॅग उघडल्यामुळे तो वाचला. धडकेत त्याच्या मोटारीसह इतर गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत अवधूत सुतार यांनी फिर्याद दिली आहे. उपनिरीक्षक प्रवीण कांचन तपास करत आहेत.