सांगली जिल्ह्यात पाच महिन्यांत ११२ अपघातात ६९ ठार, १२६ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:21 IST2022-06-10T16:20:57+5:302022-06-10T16:21:28+5:30
बऱ्याचदा एकाने केलेल्या चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबावर आघात

सांगली जिल्ह्यात पाच महिन्यांत ११२ अपघातात ६९ ठार, १२६ जखमी
अविनाश कोळी
सांगली : विना हेल्मेट, सीटबेल्ट, मद्यपान करून वाहन चालविणे, वेगमर्यादा ओलांडणे यासह अनेक मानवी चुकांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या १५७ दिवसांमध्ये ११२ अपघात घडले असून त्यात ६९ जणांचा बळी, तर १२६ लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघातात ठार झालेल्या व अपंगत्व आलेल्या अनेकांच्या कुटुंबावर मोठे आघातही या अपघातांमुळे झाले आहेत. काही चुका टाळल्यास अपघातही टाळता येऊ शकतात.
सांगली जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत अपघातांचा आलेख वाढत आहे. हा आलेख कमी करण्यासाठी वाहतूक पोलीस व प्रशासन प्रयत्न करीत असले, तरी नागरिकांचा अपेक्षित प्रतिसाद त्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. नियम मोडून दंड भरून पुन्हा बेशिस्त वाहनचालक सुसाट सुटतात. त्यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे.
एका क्षणात कुटुंबे उद्ध्वस्त
अपघातात बळी पडलेल्या लोकांची, तसेच अपघातात अपंगत्व आलेल्या शेकडाे लोकांची कुटुंबे क्षणात उद्ध्वस्त होत आहेत. याची कल्पना वाहन चालविणाऱ्याला नसते. बऱ्याचदा एकाने केलेल्या चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबावर आघात होतो, याचेही भान वाहनचालक ठेवत नाहीत.
कोणत्या चुकांमुळे अपघात होताहेत
सीटबेल्ट, हेल्मेट न वापरणे, मद्यपान करुन वाहन चालविणे, वेगमर्यादा ओलांडणे, जादा प्रवासी वाहतूक, चुकीच्या दिशेने वाहन चालविणे, सिग्नल तोडणे अशा चुकांमुळे ९९ टक्के अपघात होत असल्याचे निरीक्षण वाहतूक विभागाने नोंदविले आहे. या चुका टाळता येऊ शकतात.