Sangli: मिरजेतील खूनप्रकरणी प्रथमेश ढेरे टोळीतील १५ जणांना ‘मोक्का’, चौघेजण पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:13 IST2026-01-14T19:12:42+5:302026-01-14T19:13:29+5:30
सुनील फुलारी यांची कारवाई

Sangli: मिरजेतील खूनप्रकरणी प्रथमेश ढेरे टोळीतील १५ जणांना ‘मोक्का’, चौघेजण पसार
सांगली : मिरजेतील निखिल विलास कलगुटगी याच्या खुनातील संशयित प्रथमेश ढेरे याच्या टोळीतील १५ जणांना ‘मोक्का’ लावण्यास विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी मंजुरी दिली. टोळीतील ११ जण अटकेत असून, चौघेजण पसार आहेत.
टोळीप्रमुख प्रथमेश सुरेश ढेरे (वय २५, रा. ढेरे गल्ली, मिरज), सदस्य विशाल बाजीराव शिरोळे (रा. मंगळवार पेठ), सर्फराज बाळासाहेब सय्यद (वय २२, रा. ढेरे गल्ली), प्रतीक सचिन चव्हाण (वय २०, रा. दिंडी वेस), करण लक्ष्मण बुधनाळे (वय २१, रा. दुर्गानगर, मिरज), गणेश ऊर्फ निहाल तानाजी कलगुटगी (वय २७, रा. मंगळवार पेठ), सूरज चंदू कोरे (वय २६, रा. ढेरे गल्ली, ब्राह्मणपुरी), संग्राम राजेश यादव (वय २६, रा. शिवनेरी चौक, ब्राह्मणपुरी),
सलीम गौस पठाण (रा. गव्हर्नमेंट कॉलनी, खतीबनगर), चेतन सुरेश कलगुटगी (रा. वडर गल्ली, मिरज), सोहेल ऊर्फ सुहेल जमीर तांबोळी (रा. खणभाग) तसेच पसार असलेले महंमदसिराज ऊर्फ सोहेल अब्बास आगलावणे (रा. पाटील हौद, मिरज), अक्षय सदाशिव कांबळे (रा. खतीबनगर), अमन समीर मुल्ला (रा. ब्राह्मणपुरी, ढेरे गल्ली), दीप अश्विन देवडा (रा. शनिवार पेठ) यांना ‘मोक्का’ लावण्यात आला आहे.
टोळीप्रमुख ढेरे व सदस्य उपजीविकेसाठी कोणताही कामधंदा करत नाहीत. या टोळीचे कार्यक्षेत्र मिरज शहर परिसर आहे. टोळीकडून २०१७ पासून गुन्ह्यांची मालिका सुरू होती. टोळीने वर्चस्व टिकवण्यासाठी तसेच आर्थिक फायद्यासाठी, इतर लाभ मिळवण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा जमाव जमवणे, खंडणीसाठी अपहरण करणे, दरोडा, गंभीर दुखापत करणे, विनयभंग, विनापरवाना शस्त्र बाळगणे, हत्यार घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजवणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. टोळीने परिसरात मोठी दहशत निर्माण केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले होते.
मिरजेतील निखिल कलगुटगी याच्या खुनात संशयितांचा सहभाग होता. त्यापैकी ११ जणांना अटक केली असून, चौघेजण पसार आहेत. टोळीविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ नुसार अतिरिक्त कलम लावण्यासाठी मिरज शहर पोलिसांनी प्रस्ताव बनवला होता. अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर यांच्याकडून अभिप्राय घेऊन उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांनी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांना प्रस्ताव सादर केला. अधीक्षक घुगे यांनी विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना तो मंजुरीसाठी पाठवला. फुलारी यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास आता विटा उपविभागाचे उपअधीक्षक विपुल पाटील यांच्याकडे वर्ग केला आहे.
संघटित गुन्हेगारीचा कणा मोडला
महापालिका निवडणूक आणि आगामी निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालून त्यांचा कणा मोडण्यासाठी विशेष महानिरीक्षक फुलारी यांनी मोक्का लावण्यास मंजुरी दिली. यापुढेही संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर नजर ठेवली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.