रत्नागिरीत तीन दिव्यांग शिक्षक निलंबित; कर्मचारी, शिक्षकांमध्ये खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:33 IST2026-01-06T13:32:47+5:302026-01-06T13:33:04+5:30
जिल्हा परिषदेकडून कारवाई

रत्नागिरीत तीन दिव्यांग शिक्षक निलंबित; कर्मचारी, शिक्षकांमध्ये खळबळ
रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या पडताळणीमध्ये निकषात बसत नसतानाही वाहतूक भत्त्याचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील ३ शिक्षकांवरजिल्हा परिषदेने निलंबनाची कारवाई केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे.
दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यातील सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा परिषदअंतर्गत कार्यरत असलेल्या वर्ग-३ व वर्ग-४ मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी मोहीम प्रशासनाकडून राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १०६ कर्मचारी आणि शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. त्या कर्मचारी, शिक्षकांनी ज्या-ज्या जिल्ह्यातून दिव्यांग प्रमाणपत्र घेतले आहे त्या जिल्ह्यांमध्ये प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठवण्यात आलेले आहे.
जिल्हा परिषदेचे मंडणगड तालुक्यातील शिक्षक महावीर सोमनाथ मिसाळ आणि रत्नागिरी तालुक्यातील शिक्षक प्रदीप कृष्णा मोरे व राकेश म्हादू भंडारे या शिक्षकांनी ३० टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र सेवेत दाखल होण्यासाठी सादर केले होते. या शिक्षकांनी शासनाकडून वाहतूक भत्त्याचा लाभ घेतला आहे. ४० टक्के दिव्यांग असलेल्या कर्मचारी, शिक्षकांना या भत्त्याचा लाभ देता येतो. तरीही निकषात बसत नसतानाही हा लाभ घेतल्याचे प्रमाणपत्र पडताळणीनंतर समोर आले. त्यामुळे त्या तिन्ही शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.