लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेची लूट करुन मारहाण, मुंबई गोवा महामार्गावर राजापूर येथील प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:57 IST2025-10-04T15:57:19+5:302025-10-04T15:57:47+5:30
महिलेने गाडीतून उडी मारुन आपला जीव वाचवला

संग्रहित छाया
राजापूर : लिफ्ट मागणाऱ्या महिलेकडील रोख रक्कम, मोबाईल आणि सोन्याचा दागिना लुटल्याची खळबळजनक घटना गुरुवार २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ते राजापूर यादरम्यान घडली. लूट करणाऱ्या कारचालकाने त्या महिलेच्या डोक्यात रॉड घातल्याने ती गंभीर जखमी झाली आहे.
या महिलेने धाडस दाखवून गाडीचा दरवाजा उघडून उडी मारुन आपला जीव वाचवला. पळून गेलेल्या कारचालकाचा पोलिस शोध घेत आहेत. रश्मी प्रभाकर चव्हाण (वय ६५, रा. कोदवली-तरळवाडी, राजापूर) असे या जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर रत्नागिरीत जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोदवली येथे राहणाऱ्या रश्मी चव्हाण गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान कोदवली येथून राजापूरला येण्यासाठी बस स्टॉपवर उभ्या होत्या. त्यांनी मुंबईकडून सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या एका कारला हात दाखवला. कारचालकाने त्यांना लिफ्ट दिली. मात्र कार चालकाने त्यांना राजापुरात न उतरवता तो त्यांना पुढे घेऊन जाऊ लागला. आपल्यासोबत काहीतरी अघटित घडतेय याची कल्पना चव्हाण यांना आली. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचालकाने त्यांच्या गळ्यातील दागिने काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी जोरदार प्रतिकार केला.
कारचालकाने त्यांच्याकडील रोख पाच हजार रुपये, २५ हजार रुपये किमतीची सोन्याची बुगडी आणि तीन हजार रुपयांचा मोबाईल काढून घेतला. अन्य दागिने काढण्याचा प्रयत्न तो करत असताना कारचालकाने त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान महामार्गावरील मोठ्या पुलाच्या पुढील रस्त्यावर रश्मी चव्हाण यांनी दरवाजा उघडून गाडीतून उडी मारली. चव्हाण यांनी गाडीतून उडी मारल्यानंतर हा कारचालक पुन्हा गाडी मागे वळवून मुंबईच्या दिशेने फरार झाला.
गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या चव्हाण यांना स्थानिक रिक्षाचालक व ग्रामस्थांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरीला पाठवण्यात आले. राजापूर पोलिसांनी या प्रकाराची तत्काळ दखल घेत तपास सुरू केला आहे.
ती गाडी वॅगन-आर
महामार्गावरील पेट्रोल पंप तसेच अन्य ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम पोलिसांनी हाती घेतले आहे. ही वॅगन-आर कार असल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. महामार्गावर दिवसा घडलेल्या या प्रकाराने खळबळ उडाली आहे.