Ratnagiri Accident: त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधी करून परतताना कार उलटली; दोन ठार, दोन जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 18:51 IST2025-11-19T18:50:48+5:302025-11-19T18:51:05+5:30
तत्पूर्वीच काळाने घातला घाला

Ratnagiri Accident: त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक विधी करून परतताना कार उलटली; दोन ठार, दोन जखमी
मंडणगड : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे धार्मिक कार्यक्रम आटोपून केळशीकडे (ता. दापोली) जाताना कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटून झालेल्या अपघातात दाेघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात मंगळवारी (दि. १८) पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला तालुक्यातील आंबडवे-लोणंद महामार्गावर शिरगाव येथे झाला.
कार चालक शंकर वसंत करमरकर (वय ४६, रा. देहेण, राजापूर, सध्या रा. दापाेली) आणि हर्षदा हेरंब जोशी (वय ७०, रा. टिळक आळी, रत्नागिरी) अशी अपघातात मृतांची नावे आहेत. तर प्रमोद मुकुंद लिमये (वय ६५) आणि ओंकार प्रमोद लिमये (वय ३५, दाेघेही रा. केळशी, दापाेली) हे गंभीर जखमी झाले आहेत.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर करमरकर हे कार (एमएच ०८, एएक्स ९५८९) घेऊन नाशिक येथून केळशीकडे येत हाेते. पहाटे पाच वाजण्याच्या सुमाराला ते तालुक्यातील शिरगाव येथे आले असता, त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या बाजूला गटारात उलटली. यात शंकर करमरकर आणि हर्षदा जोशी यांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच या गाडीतून प्रवास करणारे प्रमोद मुकुंद लिमये आणि ओंकार प्रमोद लिमये गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम भिंगळोली ग्रामीण रुग्णालयात दाखल करून नंतर महाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तत्पूर्वीच काळाने घाला घातला
अपघातग्रस्त गाडीतील सर्वजण नातेवाईक असून, ते एका धार्मिक विधीसाठी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे रविवारी रात्री गेले हाेते. तेथील कार्यक्रम आटाेपून साेमवारी रात्री हे सर्वजण केळशी गावाकडे निघाले हाेते. मात्र, तत्पूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.